मैत्रेय प्रॉपर्टी विक्रीनंतर गुंतवणूकदारांना मिळणार हक्काचे पैसै
पाचोर्याचे आमदार किशोर पाटील यांची माहिती : लवकरच होणार मालमत्ता विक्रीची प्रक्रिया : मुंबईत राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत बैठक
भुसावळ : मैत्रेय कंपनीत राज्यभरातील सुमारे 38 लाख गुंतवणूकदारांच्या दोन हजार कोटींहून अधिक ठेवी अडकल्याने ठेवीदार व एजंट हवालदील झाले आहेत. बुधवार, 7 रोजी मंत्रालयात गृह राज्यमंत्री शंभुराजे देसाई, पाचोर्याचे आमदार किशोर पाटील यांच्यासह या विषयाशी संबंधित अधिकार्यांची बैठक पार पडली. प्रसंगी देसाई यांनी आतापर्यंत मैत्रेय विषयात झालेल्या कारवाईचा आढावा अधिकार्यांकडून जाणून घेतला. दरम्यान, मैत्रेयच्या राज्यभरातील प्रॉपर्टी शासनाकडे अटॅच करण्यात आल्या असून त्यांचा आता लवकरच लिलाव करण्यात येणार असून या माध्यमातून गुंतवणूकदारांना लवकरच त्यांच्या हक्काची रक्कम परत मिळणार असल्याचे पाचोर्याचे आमदार किशोर पाटील म्हणाले.

गुंतवणूकदारांना रक्कम मिळण्याबाबत आमदारांनी मांडली भूमिका
पाचोर्याचे आमदार किशोर पाटील यांनी राज्या-परराज्यातील सुमारे 38 लाख गुंतवणूकदारांची सुमारे दोन हजार कोटींहून अधिक रक्कम या कंपनीत अडकल्याने ठेवीदारांसह एजंट हवालदील झाले असल्याचे शंभूराजे देसाई यांच्या निदर्शनास आणून दिले. 70 टक्के महिला एजंटांनी नागरीकांकडील पैसा या कंपनीत गुंतवला असून ठेवीदार आता एजंटांकडे वारंवार पैशांबाबत विचारणा करीत असल्याने तातडीने हा तिढा सुटण्याची अपेक्षा शंभूराजे देसाई यांच्याकडे आमदारांनी व्यक्त केली.
राज्यभरातील प्रॉपर्टींचा लवकरच होणार लिलाव
मैत्रेय कंपनीच्या राज्यासह अन्य भागातील प्रॉपर्टी शासनाकडे अटॅच करण्यात आल्या असून त्यांचा तातडीने लिलाव करण्यासंदर्भात प्रक्रिया अवलंबवावी, असे निर्देश गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी प्रसंगी अधिकार्यांना दिले. लिलाव प्रक्रियेतून प्राप्त झालेली रक्कम एस्त्रो खात्यात जमा करून त्याचे ठेवीदारांना वाटप करावे, असे निर्देशही देसाई यांनी दिले. विशेष सरकारी अभियोक्ता यांनी या प्रकरणाचे गांभीर्य न्यायालयाच्या निदर्शनास आणून जिल्हास्तरावरील प्रॉपर्टी विक्रीबाबत निर्णय घ्यावा, असेही राज्यमंत्री म्हणाले.
ठेवीदारांना निश्चित रक्कम मिळणार : आमदार किशोर पाटील
मैत्रेय कंपनीच्या प्रॉपर्टी शासनाकडे अटॅच करण्यात आल्या असून लवकरच त्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. ठेवीदारांना न्याय मिळण्यासाठी आपला 2016 पासून लढा सुरू आहे. प्रॉपर्टी विक्रीची प्रक्रिया काहीशी किचकट असल्याने त्यास काहीसा वेळ लागणार असलातरी गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम मिळाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असेही आमदार किशोर पाटील म्हणाले.