माजी मंत्री एकनाथराव खडसेंना ईडीचे समन्स


मुंबई : भोसरी येथील जमीन घोटाळ्याप्रकरणी माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली असतानाच आता माजी मंत्री खडसे यांनादेखील सक्तवसूली संचलनालयानं समन्स बजावत गुरूवार, 8 जुलै रोजी सकाळी 11 वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी खडसे यांना युतीच्या सरकार काळात महसूल मंत्री पदही गमवावे लागले होते शिवाय खडसे यांच्याशिवाय त्यांची कन्या शारदा यांनादेखील ईडीने चौकशीला बोलावले होते.

नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडचे नेते आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मागे ईडीच्या तपासाचा ससेमिरा लागल्याचं पाहायला मिळत आहे. माजी गृह मंत्री अनिल देशमुख, प्रताप सरनाईक यांच्यानंतर आता एकनाथ खडसेंकडे ईडीनं मोर्चा वळवला आहे.




काय आहे नेमके प्रकरण?
महसूल मंत्री पदावर असताना खडसेंनी पदाचा गैरवापर करत भोसरीत जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. खडसे यांच्या सौभाग्यवती मंदाकिनी खडसे यांच्या नावाने तीन कोटी 75 लाखांना तीन एकर जमिनीचा व्यवहार करण्यात आला. पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद करण्यासाठी एक कोटी 37 लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी ही भरण्यात आली. कोलकाता येथील उकानी आणि मंदाकिनी खडसे यांच्यात हा व्यवहार झाल्याचं दाखविण्यात आल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. 28 एप्रिल 2016 मध्ये जमीन व्यवहार झाला मात्र तत्पूर्वीच इथं अनेक कंपन्याचं काम सुरू असताना हा व्यवहार कसा काय झाला? असा प्रश्न 30 मे 2016 साली तक्रारदार हेमंत गावंडे यांनी उपस्थित केला होता.

खडसेंच्या पत्रकार परीषदेकडे लागले लक्ष
दरम्यान, ईडीच्या कार्यालयात जाण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात खडसे हे पत्रकार परीषद घेणार असल्याचे पक्षाने जाहीर केले आहे. या पत्रकार परिषदेत ते भोसरी जमीन प्रकरणाशी संबंधीत माहिती देण्यासोबत काही गौप्यस्फोट देखील करण्याची शक्यता असल्याने या पत्रकार परीषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !