भुसावळ शहर खड्डेमुक्त करून चौफेर विकास करणार : प्रमोद नेमाडे


प्रभारी नगराध्यक्षाची संधी : 16 रोजी सर्वसाधारण सभेचा मुहूर्त

भुसावळ : भुसावळ शहराचा चौफेर विकास करण्यासह शहरात रस्त्यांची डांबरीकरणाचे कामे प्राधान्याने करून शहरवासीयांची खड्ड्यातून मुक्ती करण्यात येईल तसेच कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वीच शहरवासीयांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे नियोजन असल्याचे भुसावळचे प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे म्हणाले. लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे आगामी काही दिवसांसाठी रजेवर गेल्याने नेमाडेंनी गुरुवारी आपल्या पदाचा पदभार स्विकारला. याप्रसंगी त्यांनी आगामी काळात होणार्‍या विकासकामांची माहिती दिली.

प्रभारी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला
लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या पुतण्याचे 13 जुलै रोजी लग्न असल्याने ते रजेवर गेल्याने गुरुवारी उपनगराध्यक्ष प्रमोद नेमाडे यांच्याकडे पदभार आल्यानंतर त्यांनी तो स्वीकारला. यावेळी माजी नगरसेवक वसंत पाटील, पाणीपुरवठा सभापती किरण कोलते, पुरुषोत्तम नारखेडे, किशोर पाटील, सतीश सपकाळे, निक्की बतरा, देवेंद्र वाणी, गिरीष महाजन, राजेंद्र नाटकर, दिनेश नेमाडे, अजय नागराणी, प्रा.दिनेश राठी आदींसह नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.




16 रोजी सर्वसाधारण सभा
प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे यांच्या कार्यकाळात 16 रोजी पालिकेची सर्वसाधारण सभा होत आहे. या सभेच्या अजेंड्यावर तब्बल 317 शहर विकासाचे विषय आहेत. माजी मंत्री एकनाथराव खडसे, आमदार संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात यापुढे आणखी विकासकामे केली जात शिवाय शहराचा चेहरा-मोहरा आपण बदलणार असल्याचे प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !