साडेसात लाखांची लाच भोवली : पोलीस निरीक्षकासह सहा.निरीक्षक जाळ्यात
सोलापूर : सोलापूर सलगर वस्ती पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक संपत पवार व सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे यांना शुक्रवारी रात्री साडेसात लाखांची लाच घेताना एसीबीने अटक केल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. सलगर वस्ती पोलिस ठाणे अंतर्गत अवैद्य मुरूम उपसा प्रकरणात गुन्हा दाखल असून त्यात आरोपीला या गुन्ह्यात मदत करण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती. शुक्रवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास जुना पुना नाका भागात सहा.निरीक्षक रोहन खंडागळे यांना लाच घेताच त्यांना अटक करण्यात आली. वरीष्ठ निरीक्षक संपत पवार यांच्या सांगण्यावरून लाच घेतल्याची कबुली खंडागळे यांनी दिल्यानंतर पवार यांनाही अटक करण्यात आली.