मुंबईत तीन दुर्घटनांमध्ये 25 जणांचा दुर्देवी मृत्यू
मुंबई : चेंबूर, विक्रोळी आणि भांडूपमध्ये झालेल्या तीन दुर्घटनांमध्ये 25 जणांचा दुर्दैवीरीत्या मृत्यू झाला आहे. चेंबूरमध्ये दरड कोसळून 16 जणांचा तर विक्रोळीत झोपडपट्टी कोसळून सात जणांचा मृत्यू झाला शिवाय भांडूपमध्येही भिंत कोसळून 16 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. मुंबईत भिंत कोसळून मृत झालेल्या व्यक्तिंच्या परीवाराला प्रत्येकी दोन लाख रुपयांच्या मदतीची घोषणा पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आली तर या घटनांमधील जखमींना 50 हजार रुपयांची घोषणा करण्यात आली. या घटनेबद्दल पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शाह यांनी शोक व्यक्त केला.
चेंबरमध्ये 16 जणांचा मृत्यू
शनिवारी मध्यरात्री चेंबूरच्या भारतनगर परीसरात दरड कोसळल्यामुळे दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला असून, ५ जण जखमी झाले आहेत. १६ मृतांपैकी रात्री ऊशिरापर्यंत १४ जणांची ओळख पटली होती तर २ जणांची ओळख पटली नव्हती. मीना झिमुर (४५), पंडित राम गोरसे (५०), शीला गौतम पारधे (४०), शुभम गौतम पारधे (१०), श्रृती गौतम पारधे (१५), मुकेश जयप्रकाश अग्रहारी (२५), जिजाबाई तिवारी (५४), पल्लवी दुपारगडे (४४), खुशी सुभाष ठाकुर (२), सुर्यकांत रविंद्र झिमुर (४७), उर्मिला ठाकूर (३२), छाया पंडित गोरसे (४७), अपेक्षा सुर्यकांत झिमुर (२०), प्राची पंडित गोरसे (१५) अशी मृतांची नावे असून, दोघांची ओळख पटलेली नाही.
विक्रोळी भागात इमारत कोसळून सात जणांचा मृत्यू –
विक्रोळी येथील दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून, एक जण जखमी झाला आहे. अंकित तिवारी (२३), रामनाथ राजनारायण तिवारी (४५), आशिष विश्वकर्मा (१९), प्रिन्स हंसराज विश्वकर्मा (११), कल्पना जाधव (३५), साहेबराव जाधव (४४), कविता रामनाथ तिवारी (४२) अशी येथील मृतांची नावे आहेत.