आदिशक्ती संत मुक्ताई पालखी सोहळा पंढरपूरकडे रवाना
मुक्ताईनगर : टाळ, मृदुंगाचा गजर करीत आदिशक्ती संत मुक्ताई पालखी सोहळा मुक्ताईनगर येथून सोमवारी पहाटे चार वाजता शिवशाही बसने रवाना आषाढी एकादशीच्या वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाला. यावर्षी पादुका पूजेचा मान भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील वारकरी दीपक मराठे यांना मिळाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्यात 40 वारकर्यांचा सहभाग होता. हा पालखी सोहळा बसने बुलढाणा, जालना, बीड, येरमाळा, बार्शीमार्गे सोमवारी सायंकाळी पंढरपुरात दाखल होईल, अशी माहिती संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील यांनी दिली.
पालखी सोहळ्यासोबत 40 भाविकांना परवानगी
पालखी सोहळा सोबत 40 वारकरी भाविकांना जाण्याची परवानगी मिळाली आहे. त्यात संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त, पालखी सोहळा प्रमुख, पुजारी, मानकरी, सेवाधारी, संत मुक्ताबाई फडावरील महाराज मंडळी, गायक, वादक, कीर्तनकारांसह सद्गुरु सखाराम महाराज, सद्गुरु मुकुंद महाराज, सदगुरू झेंडुजी महाराज, सद्गुरु दिगंबर महाराज, सद्गुरु पंढरीनाथ महाराज, सद्गुरु निवृत्ती बाबा वक्ते, सद्गुरु दत्तूजी महाराज, सद्गुरु मांगोजी महाराज, सारंगधर महाराज यांचा समावेश आहे.



