भुसावळ शहरात रीपाइंची राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात निदर्शने
बनावट दारू निर्मिती कारखानाप्रकरणी मुख्य सूत्रधाराला अटक करण्याची मागणी
भुसावळ : शहरातील शिवपूूर कन्हाळे रस्त्यावरील व्ही.आय.पी.कॉलनीजवळील फर्निचरच्या गोदामात सुरू असलेल्या बनावट देशी दारूच्या कारखान्यावर पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई केली मात्र स्थानिक पथकाला याबाबत साधी माहितीदेखील नसल्याचे आश्चर्य आहे. हा कारखाना नेमका कोणाच्या आशीर्वादाने सुरू होता व या कारखान्याचा मुख्य सूत्रधार नेमका कोण? ही बाब स्पष्ट होवून दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटातर्फे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांना निवेदन देवून करण्यात आली. प्रसंगी रीपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात राज्य उत्पादनच्या कार्यालयाबाहेर पदाधिकार्यांनी जोरदार निदर्शने करीत घोषणाबाजी केली.
स्थानिक पथकाच्या कामगिरीवर संशय
निवेदनाचा आशय असा की, पाचशे किलोमीटर अंतरावरील पुण्याचे पथक भुसावळातील कारखान्यावर कारवाई करते मात्र कारखान्यापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय असताना स्थानिक पदाधिकार्यांना या कारखान्याबाबत काहीच माहिती का कळत नाही? असा सवाल यावेळी पदाधिकार्यांनी उपस्थित केला. शिवपूर कन्हाळे शिवारातील व्ही.वाय.पी.कॉलनी जवळील रवींद्र ढगे यांच्या मालकीच्या गणेश पावडर कोटींग फर्निचरच्या गोदामात बिनबोभाट बनावट देशी दारू बनवण्याचा प्रकार सुरू होता. यास वरदहस्त नेमका कुणाचा? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. या कारखान्यातून भुसावळ तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर दारूचा पुरवठा झाल्याचा संशय असून त्याबाबत चौकशीची मागणी करण्यात आली. शहर व तालुक्यातील सर्व अधिकृत दारू दुकानाची तपासणी करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.



यांच्या उपस्थितीत दिले निवेदन
रीपाइंचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे व जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली खान्देश प्रदेश अध्यक्ष लक्ष्मणराव जाधव, युवा नेते पप्पू सुरडकर, शरद सोनवणे, बाळू सोनवणे, प्रकाश सोनवणे, विश्वास खरात, यश जोशी, प्रकाश तायडे, नरेंद्र आव्हाड, भगवान निरभवणे, गोरखनाथ सुरवाडे, आकाश ढिवरे, दिलीप मोरे यांच्यासह व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
काँग्रेस कमेटीचे प्रांताधिकार्यांना निवेदन
भुसावळ : भुसावळ शहर काँग्रेस कमेटीने प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांना निवेदन देत अवैधरीत्या देशी दारूची विक्री करणार्यांवर कारवाईची मागणी केली. शहरातील मद्य दुकानांची नियमित तपासणी करावी तसेच अवैधरीत्या दारूची विक्री थांबवावी, अशी अपेक्षा निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली. निवेदन देताना भुसावळ शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष रवींद्र निकम, भगवान मेढे, शैलेंद्र अहिरे, विलास खरात, महेंद्र महाले, सलीम गवळी, हमीदा गवळी, संतोष साळवे, सुनील जवरे, राजू डोंगरदिवे आदींची उपस्थिती होती.

