पोलीस उपअधीक्षकाने मागितली दिड कोटींची लाच : पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात
परभणी : सेलू, जि.परभणी येथील पोलीस उपअधीक्षक राजेंद्र गमकरण पाल (55) व सहकारी पोलीस नाईक गणेश लक्ष्मणराव चव्हाण (37) यांनी तक्रारदारास तडजोडीअंती दिड कोटींची लाच मागितल्याचा प्रकार उघड झाला असून या लाचेतील दहा लाखांची रक्कम स्वीकारताना पोलीस नाईक गणेश चव्हाण यास मुंबई एसीबीच्या पथकाने अटक केल्याने पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस उपअधीक्षक पाल व नाईक चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संभाषण व्हायरल झाल्याची धमकी देत मागितली लाच
लाच प्रकरणात तक्रार देणार्या मित्राचा अपघात मृत्यू झाल्याप्रकरणी 3 मे 2021 रोजी गुन्हा दाखल झाला आहे. मयताच्या पत्नीशी तक्रारदार यांचे संभाषण झाल्यानंतरची क्लीप व्हायरल झाल्याने 9 जुलै 2021 रोजी पोलीस उपअधीक्षक राजेंद्र पाल यांनी तक्रारदारास त्यांच्या कार्यालयात बोलावले होते. ‘तुझी व्हायरल झालेली क्लिप मी ऐकली असून त्यातून तुला बाहेर पडावयाचे असेल तर मला 2 कोटी रुपयें द्यावे लागतील, असे सुनावले’ तसेच तक्रारदाराला वारंवार फोन करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली व दोन कोटी रुपये लाचेची मागणी केली. तक्रारकर्त्याने या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई यांच्याकडे 22 जुलै 2021 रोजी लाचेची पडताळणी करीत तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. 23 जुलै रोजी पोलीस उपअधीक्षक पाल यांनी दोन कोटी रुपयांची मागणी करीत तडजोडीत एक कोटी 50 लाखांची रक्कम मागितल्याचे स्पष्ट झाले तर पोलीस नाईक चव्हाण याने तक्रारकर्त्याच्या भावाकडून लाचेपोटी 10 लाख रुपयांची रक्कम स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली. या कारवाईने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.