लाचखोर मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात
पाच हजारांची मागणी करताना नाशिक एसीबीने भरवला ‘वर्ग’ : शिक्षण क्षेत्रात खळबळ
नाशिक : तक्रारदाराच्या सातव्या वेतन आयोगाचा फरक काढून दिल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून तडजोडीपोटी पाच हजारांची लाच मागून ती स्वीकारताच दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड शासकीय माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र दामू कळसाईत (51) यांना नाशिक एसीबीच्या पथकाने अटक केल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली.
नाशिकमध्ये स्वीकारली लाच
35 वर्षीय तक्रारदार पिंपरखेड आश्रमशाळेत नोकरीस असून त्यांच्या सातव्या वेतन आयोगाचा फरक काढून दिल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून आरोपी मुख्याध्यापक राजेंद्र दामू कळसाईत यांनी शुक्रवार, 30 रोजी सहा हजारांची लाच मागितली व त्यात तडजोड होवून पाच हजारांची रक्कम देण्याचे ठरले. तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार करताच सापळा रचण्यात आला. शनिवारी दुपारी आरोपी मुख्याध्यापकांनी तक्रारदाराकडून अंबिका सुपर मार्केट, मेरी लींक रोड, नाशिकसमोर लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक साधना भोये-बेलगावकर, पोलीस निरीक्षक उज्ज्वलकुमार व्ही.पाटील, हवालदार चंद्रशेखर मोरे, हवालदार प्रफुल माळी, नाईक एकनाथ बाविस्कर आदींच्या पथकाने केली.