सहा.पोलीस निरीक्षकाने केला महिलेवर अत्याचार
पिंपरी : सातारा ग्रामीण पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाविरोधात बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली. पहिल्या बायकोला घटस्फोट देऊन महिलेला नांदायला घरी घेऊन जातो, असे आश्वासन देत पोलीस अधिकार्याने अत्याचार केल्याचा आरोप आहे. ही घटना पिंपळे गुरव येथे घडली. शिवाजी बबन भोसले असे गुन्हा दाखल झालेल्या संशयी आरोपी अधिकार्याचे नाव आहे.
सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
संशयीत आरोपी सध्या सातारा ग्रामीण पोलीस मुख्यालय नियंत्रण कक्ष येथे कार्यरत आहे. याबाबत पीडित महिलेने सोमवारी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 28 फेब्रुवारी 2021 ते 15 जून 2021 या कालावधीमध्ये शिवम बिल्डिंग, ओंकार कॉलनी, पिंपळे गुरव येथे घडली. आरोपी यांनी फिर्यादीसोबत गंधर्व पद्धतीने विवाह केला. पहिल्या बायकोला घटस्फोट देऊन फिर्यादी यांना नांदायला घरी घेऊन न जाता पहिल्या बायकोपासून घटस्फोट घेतल्यानंतर तुला नांदायला घेऊन जातो, असे वारंवार खोटे बोलून फिर्यादी यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यांना शिवीगाळ करून बदनाम करण्याची धमकी दिली. तसेच त्यांना वारंवार मारहाण केली. या प्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक सोळुंके अधिक तपास करीत आहेत.