भुसावळात ईद ए मिलादचा उत्साह : मिरवणुकीने वेधले लक्ष
भुसावळ : शहरात ईद ए मिलादनिमित्त मुस्लीम बांधवांनी मौलानांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळीच मिरवणूक (जुलूस) काढला. केवळ 30 नागरीकांना त्यासाठी परवानगी देण्यात आल्याने नियमांचे पालन करीत मिरवणूक काढण्यात आली. खडका रोडवरील रजा टॉवरपासून मंगळवारी सकाळी निघालेला जुलूस अमरदीप चौक, शिवाजी नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, मॉडर्न रोड, सराफ बाजार, जामा मशीद, भजे गल्ली, जाम मोहल्ला मार्गे परत रजा टॉवर चौकात आला. यावेळी शहरातील विविध मशीदीमधील मौलाना, ट्रस्टी आणि मोजके समाज बांधव यांची उपस्थिती होती. सर्वात पुढे फलक धरून जुलूसला प्रारंभ झाला. जुलूसचे नेतृत्व शेख सलीम शेख चुडीवाले, शेख सलीम शेख अमीर, माजी नगरसेवक साबीर शेख यांनी केले. शेख पापा शेख कालू आदी उपस्थित होते. यावेळी मौलाना मसऊर रजा, मौलाना अशरफ रीजवी, मौलाना अल्लाह बक्ष आदी उपस्थित होते.
पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त
डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ प्रभारी निरीक्षक प्रताप इंगळे यांच्यासह चार अधिकारी, 66 पोलीस कर्मचारी, 33 होमगार्ड, एक एसआरपी प्लॉटून आदींचा बंदोबस्त होता.



