ब्रेकींग न्यूज : धानोर्यात चोरट्यांनी इंडिकॅश कंपनीचे एटीएम मशीन लांबवले
जळगाव जिल्ह्यात खळबळ : दोन वर्षात तिसर्यांदा घडली घटना
चोपडा : चोपडा तालुक्यातील धानोरा गावातील बसस्थानकाजवळील इंडीकॅश बँकेचे एटीएम बुधवार, 20 रोजी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी लांबवल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे दोन वर्षात तिसर्यांदा हा प्रकार घडल्याने माहितगार चोरट्यांनी हे काम केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. गुरुवार, 21 रोजी पहाटे एटीएम चोरीची बाब कळताच गावात खळबळ उडाली. या एटीएममध्ये सुमारे दिड ते दोन लाख रुपयांची कॅश असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
पोलिसांनी केली पाहणी
गुरुवारी पहाटे एटीएम चोरीला गेल्याची माहिती गावातील ग्रामस्थांनी पोलीस पाटील दिनेश पाटील यांना कळवल्यानंतर अडावद पोलिसांना माहिती देण्यात आली. अडावद पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक किरण दांडगे, उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील, कादीर शेख व कर्मचार्यांनी पाहणी केली. याच रस्त्याच्या पुढे असलेले सदगुरु स्विट्स आणि नमकीन दुकानात असलेले सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले असता त्यात गुरुवार, 21 रोजी पहाटे 2 वाजुन 23 मिनिटांनी एक मोठा ट्राला जळगावकडे तोंड करुन उभा दिसून आला आहे. समोर असलेले झि.तो.महाजन शाळेचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद आढळले तर गावातील कॅमेरेही बंद आढळले. या एटीएममध्ये अंदाजे दिड लाखापर्यंत रोकड असल्याची माहिती आहे.

दोन वर्षात तिसरी घटना
गेल्या दोन वर्षात इंडीकॅश कंपनीचे एटिएम तीन वेळा फोडण्यात आले आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. माहितगार चोरट्यांनी एटीएम लांबवल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
