मोठी बातमी ! भारताने कोरोनाविरोधातील लसीकरणामध्ये गाठला 100 कोटींचा आकडा
नवी दिल्ली : लसींची टंचाई, लसीबाबत पसरलेल्या अफवा, शंका अशा सर्व अडचणींवर मात करत भारतातील आरोग्य यंत्रणा, केंद्र आणि राज्य सरकारमधील नियोजनांच्या माध्यमातून भारताने 100 कोटी नागरीकांच्या लसीकरणाचा ऐतिहासिक मैलाचा दगड भारताने गाठला आहे. जानेवारी 2020 मध्ये भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर मार्च महिन्यापासून रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने देशव्यापी लॉकडाऊनला सुरुवात झाली. 1 मार्चपासून 60 वर्षांवरील व्यक्तींना लस देण्यास सुरुवात झाली होती. तर 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील व्यक्ती आणि 1 मेपासून 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले होते.
अनेक अडथळ्यांवर केली मात
कोरोनाच्या लसीबाबतच्या अफवा, शंका आणि लसींचा तुटवडा यामुळे या लसीकरण मोहिमेत अनेक अडथळे आले. मात्र या अडथळ्यांवर मात करत देशात लसीकरण मोहीम सुरू राहिली. देशातील कोरोनाविरोधातील लसीकरणासाठी मुख्यत्वेकरून कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींचा वापर केला गेला. ऑगस्ट महिन्यापासून कोरोनाविरोधातील लसीकरणाचा वेग वाढला. तसेच काही वेळा दिवसाला 1 कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्याचा विक्रम नोंदवला गेला. दरम्यान, गुरुवार, 21 ऑक्टोबर रोजी कोरोना लसीकरणामध्ये 100 कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा ऐतिहासिक टप्पा भारताने गाठला आहे.



