दुचाकी घसरून पडताच जखमी तरुणाला ट्रकने चिरडले


जळगाव : मित्रासोबत शहरात येत असतांना दुचाकी घसरून पडलेल्या तरूणाच्या अंगावर ट्रक गेल्याने दुचाकीस्वार तरूण जागीच ठार झाला. हा अपघात शुक्रवार, 29 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गणेश कॉलनीतील गोकुळ स्वीट मार्टजवळ घडला. या अपघातात दुसरा तरूण गंभीर जखमी झाला. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तरूणाच्या नातेवाईकांनी आक्रोश केला. सौरभ बनवारीलाल तिवारी (22, महावीर नगर, जळगाव) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे. दरम्यान, लिलाधर संजय काळे (रा.कांचन नगर, जळगाव) हा तरूण गंभीर जखमी झाला आहे.

तरुणाच्या अपघाती मृत्यू हळहळ
सौरभ तिवारी यांचे गांधी मार्केटमध्ये शुजचे दुकान असून त्यावर त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास चुलत भावाला दुकानावर बसवून मु.जे.महाविद्यालय परीसरात जातो, असे सांगून जिवलग मित्र लिलाधर संजय काळे (रा.कांचन नगर) यासोबत दुचाकीने गेले. काम आटोपून ते दुकानावर येण्यासाठी गणेश कॉलनीतील गोकूळ स्वीटमार्ट समोरून जात असतांना दुचाकी घसरली. तेवढ्यात मागून भरधाव ट्रकने धडक दिली. ट्रकच्या चाकाखाली सौरभ आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर लिलाधर काळे हा गंभीर जखमी झाला. अपघात झाल्यानंतर ट्रक जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला. अपघाताची माहिती कळताच नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली. मुलाचा मृतदेह पाहून सौरभच्या आईने हंबरडा फोडला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !