वाळूचे ट्रॅक्टर उभ्या रीक्षावर आदळले
जळगाव : शहरातील शिवकॉलनी स्टॉपवर राष्ट्रीय महामार्गावर वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने उभ्या रिक्षाला जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवारी रोजी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास घडली. घटनेत रीक्षा चक्काचूर झाली असून रिक्षावरील चालक रीक्षाच्या शेजारी उभा असल्याने सुदैवाने बचावला आहे. दरम्यान,वाळूच्या ट्रॅक्टरचा महसूल विभागाचे कर्मचारी कारवाईसाठी पाठलाग करत असल्याने पकडले जावू नये या भितीने वेगाने ट्रॅक्टर चालविण्याच्या नादात हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.
पाठलाग करताना अपघात
वाळूने भरलेल्या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरने शिवकॉलनीजवळ (एम.एच. 19 व्ही.3441) या क्रमांकाच्या उभ्या प्रवासी वाहतूक करणार्या रीक्षाला जोरदार धडक दिली. त्याच वेळी काही अंतरावरून मुरूमाने भरलेला दुसरा ट्रॅक्टर समोरून येत असतांना वाळूच्या ट्रॅक्टरने रीक्षाला धडक देत थेट मुरुमाच्या ट्रॅक्टरलाही धडक दिली. या विचित्र अपघातात संपूर्ण रिक्षा चक्काचूर झाली. अपघात घडला त्यावेळी, रीक्षा चालक मजरखान सखावत खान (30, रा.पिंप्राळा हुडको, जळगाव) हे सुदैवाने रीक्षात बसलेले नव्हते. ते त्यांच्या रीक्षाच्या बाजूला उभे असल्याने बालंबाल बचावले. अपघातानंतर धडक देणार्या वाळू ट्रॅक्टरवरील चालकाने उडी मारली व ट्रॅक्टर चालक घटनास्थळावर सोडून पसार झाला .

