अधिकार्यांच्या नावाने लाच मागणारे दोघे आरटीओ एजंट पोलीस कोठडीत
आरटीओ अधिकार्यांची चौकशी होण्याची शक्यता : कारवाईने उडाली खळबळ
जळगाव : आरटीओ अधिकार्यांच्या नावाने नावाने वाहन मालकाकडून दहा हजारांची लाच स्विकारताना दोन आरटीओ एजंट यांना मंगळवारी सायंकाळी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्यानंतर लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली होती. दोघा आरोपींना बुधवारी जळगाव न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
तक्रारीनंतर आरटीओ एजंट सापडले जाळ्यात
शुभम राजेंद्र चौधरी (23, कोल्हे हिल्स गॅस गोडाऊनजवळ, जिजाऊ नगर, जळगाव ) व राम भीमराव पाटील (37, अनुराग स्टेट बँक कॉलनी, महाबळ, जळगाव) या आरटीओ एजंट यांना खेडी बु.॥ (ता. जि.जळगाव) येथील एका 39 वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीवरून सापळा रचून पकडण्यात आले होते. तक्रारदार यांनी साधारण प्रवासी बस विकत घेतल्यानंतर तिचे हस्तांतरण तक्रारदाराच्या वडिलांच्या नावावर करण्यासाठी दहा हजार रुपये लाचेची मागणी आरटीओ अधिकार्यांच्या नावाने दोघा एजंटांनी केली होती. तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदविल्यानंतर सापळा रचण्यात आला. मागणी केलेली लाचेची रक्कम स्वतःआरोपी शुभम चौधरी याने आरटीओ कार्यालय जळगावच्या आवारात पंचासमक्ष स्वीकारली म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आरोपींना आरटीओ अधिकार्यांच्या नावाने लाच मागितल्यानंतर पोलीस कोठडीत आरोपींना नेमकी कोणत्या अधिकार्याच्या नावाने लाच मागितली तसेच या प्रकारात कोण-कोण सहभागी आहे ? याची चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तपास पोलीस उपअधीक्षक शशिकांत एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव व सहकारी करीत आहेत.

