….या गावाच्या आदर्श ग्रामसेवकाचे निलंबन : कामात दिरंगाई भोवली
अमळनेर : तालुक्यातील ग्रामसेवक कैलास रामभाऊ देसले यांना ग्रामपंचायत देवगांव – देवळी येथे ग्रामपंचायत कामांत दिरंगाई व हलगर्जीपणा केल्याने शामकांत पाटील यांच्या तक्रारीनंतर निलंबित करण्यात आल्याने ग्रामसेवकांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.
तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई
कैलास रामभाऊ देसले, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत जानवे पंचायत समिती अमळनेर हे ग्रामपंचायत देवगाव-देवळी येथे कार्यरत असतांना सन 2003,2004,2005,2009,व 2010,ते 2014 या कालावधीत ग्रामपंचायत देवगाव-देवळी येथील मासिक सभा, ग्रामसभा, कोरम पूर्ण नसतांना सभा तहकूब न करता इतिवृत्त नोंदवहीत लिहिणे, मासिक सभेच्या इतिवृत्त नोंदवहीत सदस्यांच्या सह्या घेवून इतिवृत्त न लिहिणे, ग्रामसभांचे कोरम पूर्ण नसतांना सभा तहकूब न करता इतिवृत्त लिहिणे असे कामकाज केले. ग्रामसभेत विविध योजनांच्या वार्षिक जमा खर्चास मंजूरी न देणे अशी गंभीर अनियमितता केल्याचे आढळून आले. यावरून त्यांनी ग्रामपंचायत कामकाजात दिरंगाई तसेच हलगर्जीपणा केला असल्याचे म्हणत या सर्व प्रकरणावर गटविकास अधिकारी चौधरी यांना पंचायत समिती, अमळनेर सेवेतून निलंबित केले आहे. त्यांचे निलंबन मुख्यालयाबाबत तसेच दोषारोप पत्र 1 ते 4 भरून सादर करण्यात आलं असल्याचं आदेशात नमूद केलं आहे.

आदर्श पुरस्काराने ग्रामसेवक होते चर्चेत
ग्रामसेवक कैलास रामभाऊ देसले यांना देवगांव देवळी येथेच आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाला असल्याने शासनाच्या कामकाजाबाबत देखील तक्रारदार शामकांत पाटील यांनी जिल्हा परीषद जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव व जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रश्न उपस्थित केला आहे.
