इलेक्ट्रीक मोटार लावताना शॉक लागला ; एरंडोल तालुक्यातील विवाहितेचा मृत्यू
एरंडोल : नळाला पाणी आल्याने इलेक्ट्रीक मोटारीची वायर बोर्डात लावताना शॉक लागल्याने 45 वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील रवंजे बु.॥ येथे शुक्रवार, 26 रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. रत्नाबाई महिपत माळी (45) असे मयत विवाहितेचे नाव आहे. एरंडोल पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
इलेक्ट्रीक शॉकने महिलेचा मृत्यू
सूत्रांच्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील रंवजे बु.॥ येथे शुक्रवारी ग्रामपंचायतीच्या नळाला पाणी आल्यानंतर इलेक्ट्रीक मोटार लावण्यासाठी रतनाबाई माळी यांनी इलेक्ट्रीक बोर्डात वायर लावली मात्र याचवेळी त्यांना विजेचा जबर झटका बसल्याने त्या अंगणात पडून बेशुद्ध झाल्या. अत्यवस्थ अवस्थेत त्यांना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी मयताचे दीर भास्कर शांताराम माळी (42, रवंजे बु.॥, ता.एरंडोल) यांच्या खबरीनुसार एरंडोल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

