चाळीसगावात विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत

श्रीमती चंपाबाई रामरतन कळंत्री प्राथमिक विद्यालय व श्रीमती सरस्वतीबाई आवटे पी-प्रायमरी स्कूलच्या उपक्रमाने विद्यार्थी भारावले


चाळीसगाव : चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या एससीआर कळंत्री प्राथमिक विद्यालय व एसएस आवटे प्रि-प्रायमरी स्कुलमध्ये बुधवारी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा हा दुर्दम्य आशावाद घेऊन चिमुकली पाखरे शाळेत आली. मुलांच्या येण्याने शाळेचे प्रांगण पुन्हा एकदा फुलून आले. स्वागतोत्सवाच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी सर्वोदय शिक्षण संस्थेचे संचालक भगवान पाटील, शाळेचे चेअरमन डॉ.सुनील राजपूत, मुख्याध्यापक प्रमोद दायमा, मोराणकर, दीपाली चोरट, दीपाली पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले.

विविध उपक्रमातील विद्यार्थ्यांचा गौरव
मनोगत व्यक्त करताना शाळेचे चेअरमन डॉ.सुनील राजपूत यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करतांना ऑनलाईन ऑफलाईन शिक्षण तसेच कोरोनाबाबत शासकीय नियमांविषयी मार्गदर्शन करुन ‘हॅपी स्कूल’ या संकल्पनेविषयी माहिती दिली. प्रमुख अतिथी भगवान पाटील यांनी देखील मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शिष्यवृत्ती परीक्षा, एनएसएसई परीक्षा तसेच एकलव्य रेसिडेंशियल स्कुलमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. तसेच ऑनलाईन स्पर्धा, उपक्रमातील यशस्वी विद्यार्थ्यांनादेखील बक्षिसे देण्यात आली. गाडी चालकांचा देखील सत्कार करण्यात आला.






विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत
सर्वप्रथम विद्यार्थ्यांचे डिजिटल थर्मामीटरच्याद्वारे तपासणी करण्यात आली तसेच प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातावर हॅण्ड सॅनिटायजर देवून वर्गात प्रवेश देण्यात आला. विद्यार्थ्यांचे औक्षण करुन स्वागत करतांना चॉकलेट वाटप करण्यात आले. शाळेत रांगोळी काढून, पताका व फुगे लावुन सजावट करण्यात आली. मोठ्या उत्साहाने शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेचा आनंद घेतला. पालक बंधू- भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन दीपाली पाटील व आभार दीपाली चोरट यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले. नवा विश्वास, नव्या प्रेरणेने एकत्र येऊन पण सामाजिक अंतराचे भान ठेवून मास्क, सॅनिटायझर तापमान तपासणी सामाजिक अंतर ठेवणे या दररोजच्या नवीन जबाबदार्‍या स्वीकारत या नवीन आव्हानांसह पाखरांनी शाळा पुन्हा गजबजणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !