दप्तर न दिल्याने चुंचाळेतील महिला ग्रामसेवकास कोठडीत टाकण्याचे आदेश
यावल : पदभार सोडलेल्या ग्रामपंचायतीचे दप्तर देत नसल्याने तालुक्यातील चुंचाळे येथील महिला ग्रामसेवकास एक महिना न्यायालयीन कोठडीत टाकण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी काढल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. जिल्हा परीषद सदस्य पल्लवी प्रमोद सावकारे यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.
जि.प.सदस्यांनी केली होती तक्रार
चुंचाळे, ता.यावल या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक प्रियंका अशोक बाविस्कर या पूर्वी किन्ही, ता.भुसावळ येथे कार्यरत होत्या व बदली झाल्यानंतर त्यांनी किन्ही ग्रामपंचायतीचे दप्तर तेथे पदभार घेतलेल्या ग्रामसेवकाकडे दिलेच नाही. याबाबत जिल्हा परीषद सदस्या पल्लवी प्रमोद सावकारे यांनी त्यांची तक्रार केली होती व या तक्रारीवर जिल्हाधिकारी यांच्याकडे दोन महिन्यापूर्वी सुनावणी झाली होती. यात 10 दिवसांच्या आत दप्तर ताब्यात देण्याचा लेखी आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी 4 नोव्हेंबरला दिला मात्र त्यानंतरही दप्तर न दिल्याने ग्रामसेविकेला दप्तर परत देईपर्यंत किमान 30 दिवस न्यायालयीन कोठडीत टाकण्याचे जिल्हाधिकार्यांनी यावल पोलिस निरीक्षकांना दिले आहेत. अशा प्रकारे दप्तर देण्यास दिरंगाई करणार्या ग्रामसेवकांवर प्रथमचे अशा प्रकारे कठोर कारवाईचे आदेश झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.


