दापोरा शिवारातील रेल्वे रूळावर आढळलेला मयत गडचिरोलीचा रहिवासी
जळगाव : जळगाव तालुक्यातील दापोरा शिवारात रेल्वे रुळाजवळ बुधवार, 1 डिसेंबर रोजी आढळलेल्या अनोळखी तरुणाची अखेर ओळख पटली आहे. अभिजीत गजानन मिश्रा (19, रा.लाझोडा हनुमान मंदीरजवळ, गडचिरोली) असे मयत तरुणाचे नाव आहे. मित्रासह पुण्याला जाण्यासाठी गरीब रथ या रेल्वेने प्रवास करीत असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गरीब रथमधून पडल्याने तरुणाचा मृत्यू
अभिजीत मिश्रा हा त्याचा मित्र परीमल गोपीनाथ कोडापे यांच्या सोबत गडचिरोलीहून नागपूरला लक्झरीने आले. नागपूरहून पुण्याला जाण्यासाठी मंगळवार, 30 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजता गरीबरथ रेल्वेत बसले. जळगावपर्यंत आल्यानंतर रात्री 11.30 वाजता दोघांनी रेल्वेत जेवण केले. त्यानंतर परीमल हा झोपून गेला तर अभिजीत मिश्रा हा रेल्वे बोगीत जागे होता. दरम्यान पहाटे चार वाजेच्या सुमारास परीमल जागी झाला तेव्हा मित्र अभिजीत मिळून आला नाही. त्याचा शोधा घेतला असता तो मिळून न आल्याने परीमलने अभिजीतच्या वडीलांना घटनेची माहिती दिली. त्याचे वडील सेवानिवृत्त जवान आहेत. त्यांनी रेल्वे रूटवर असलेल्या सर्व रेल्वे पोलिसांना याची माहिती दिली. नगर रेल्वे पोलिसांना मुलाबाबत माहिती दिल्यानंतर तेथील पोलिसांनी जळगाव तालुका पोलिीसांशी संपर्क साधला असता अनोळखी तरूणाचा मृतदेह 1 डिसेंबर रोजी सकाळी दापोरा-शिरसोली दरम्यान रेल्वे रूळावर आढळल्याचे सांगितले. त्यानुसार शुक्रवार, 3 डिसेंबर रोजी अभिजीतचे नातेवाईक यांनी जळगाव जिल्हा रुग्णालयात येवून मुलाची ओळख पटली. याबाबत तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत अभिजीतच्या पश्चात आई, वडील व एक बहिण असा परीवार आहे. पुढील तपास हवालदार अनिल फेगडे करीत आहे.





