लग्नापूर्वीच अडीच लाखांचे दागिने घेवून नवरीची धूम : एजंटासह दोघे अखेर पोलिसांच्या जाळ्यात
चाळीसगाव : लग्न करण्याचे वचन देत विश्वास संपादन करीत दोन लाख 40 हजारांचे दागिने घेवून रफुचक्कर झालेल्या तोतया नवरीसह एजंटाला चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आशा संतोष शिंदे (31, रा.सुंदरवाडी, चिकलठाणा, जि.औरंगाबाद) व एजंट किरण भास्कर पाटील (45, आमडदे, ता.भडगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या संशयीतांनी अशा प्रकारे अनेकांना गंडा घातल्याची शक्यता असून पोलिसांकडून याबाबत अधिक चौकशी सुरू आहे.
ऐवज घेवून ठोकली धूम
चाळीसगाव तालुक्यातील डामरुण येथील घनश्याम मुरलीधर पाटील (48) यांना लग्न करण्याच्या बहाण्याने आशा संतोष शिंदे (31, सुंदरवाडी, चिकलठाणा, जि.औरंगाबाद) व एजंट किरण भास्कर पाटील (45, आमडदे, ता.भडगाव) यांनी गाठत त्यांचा विश्वास संपादन केला दोन लाख रुपये व 40 हजारांचे दागिने घेतले होते मात्र लग्न लावण्यापूर्वी या दोघांनी 2 लाख 40 हजारांचा ऐवज घेवून धूम ठोकली. या संदर्भात डामरुण येथील तक्रारदाराने चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता. तपासी अंमलदार हवालदार विजय शिंदे यांनी तपास करत महिनाभरानंतर तोतया नवरी व तिच्या साथीदारालाही बेड्या ठोकल्या. संशयीतांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 6 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.





