शाळेत निघालेल्या दोन सख्ख्या भावांना खाजगी बसने चिरडले ; एकाचा मृत्यू , दुसरा गंभीर

जामनेर तालुक्यातील देऊळगावची घटना : संतप्त जमावाने बसची केली तोडफोड


जामनेर : शाळेत जाण्यासाठी निघालेल्या दोन सख्ख्या भावंडांना खाजगी बसने चिरडल्याने या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दुसर्‍या मुलावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी खाजगी बसची तोडफोड केली. जामनेर तालुक्यातील देऊळगाव येथे शनिवारी सकाळी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात आर्यन नसीब तडवी (3) या चिमुकल्याचा मृत्यू झाला तर त्याचा भाऊ रीहान (5) हा जखमी झाला. त्याला उपचारार्थ बुलडाणा येथे हलवण्यात आले आहे.

पायी जात असलेल्या भावंडांना बसची धडक
धामणगाव बढे बसस्थानकावरुन शनिवारी बालाजी ट्रॅव्हल्स ही खाजगी बस (क्र. एम.एच.21 बी.एच.- 0647) प्रवाशांना घेऊन जामनेरकडे निघाली असताना देऊळगाव गुजरी येथे रस्त्याने शाळेत पायी जात असलेल्या रीरहान तडवी आणि आर्यन तडवी या दोन भावंडांना बसने धडक दिली. यात चाकाखाली आल्याने दोन्ही भावंडे जखमी झाली. दोघांना उपचारार्थ बुलडाणा येथे नेते असताना आर्यनचा वाटेतच मृत्यू झाला तर रीहानची तब्येत गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.






जमावाकडून बसची तोडफोड
अपघातानंतर गावातील जमावाने बसची तोडफोड केली आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाचोरा येथूनही अतिरीक्त पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या परीसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, लहान मुलांना धडक देणार्‍या बसचा चालक आणि क्लिनर यांना जमावाच्या तावडीतून पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी पहुर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !