पाचोर्यातील सराफाच्या सतर्कतेने लुट टळली : डोळ्यात मिरची पूड टाकत मारहाण करीत आरोपी पसार
पाचोरा : सराफा व्यापार्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून पैशांची बॅग लांबवण्याचा प्रयत्न सतर्क सराफामुळे फसला मात्र या घटनेमुळे सराफ बांधवांमध्ये खळबळ उडाली आहे. ही घटना पाचोरा- वरखेडी रस्त्यावर शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. कमलेश भटू बाविस्कर (रा. पाचोरा) असे या सराफाचे नाव आहे.
लुटारूंकडून सराफाला मारहाण
कमलेश बाविस्कर यांचे वरखेडी येथे त्यांचे स्वामी समर्थ ज्वेलर्स हे दुकान असून वरखेडी ते पाचोरा अशी दररोज ये-जा करतात. शनिवारी सायंकाळी ते वरखेडी येथील कापड दुकानावर कामाला असणार्या राहुल या तरुणासोबत पाचोर्याकडे मोटारसायकलीने जात होते. लोहारी-पाचोरा दरम्यान एका ढाब्याजवळ दोन जणांनी कमलेश यांची मोटारसायकल अडवित डोळ्यात मिरची पावडर फेकली. काही क्षणात लुटारुंनी त्यांना शेजारील शेतात फरफटत नेत मारहाण केली. बाविस्कर यांनी सोबत असलेल्या राहुलला यास पळून जाण्यास सांगितले. कमलेश यांनी जवळची बॅग न सोडता आरडाओरड केल्याने लुटारु तिथून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे, पिंपळगाव हरेश्वर ठाण्याचे स.पो.नि कृष्णा भोये हे कर्मचार्यांसह घटनास्थळी दाखल झाले. सराफ दुकानदारास पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.





