किन्ही गावातील तत्कालीन महिला ग्रामसेविकेला दिलासा : खंडपीठाकडून जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला स्थगिती


यावल : तालुक्यातील चुंचाळे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका यांनी किन्ही, ता.भुसावळ येथील पदभार सोडतांना ग्रामपंचायतीचे दस्तऐवज तेथील ग्रामसेवकाकडे सुपूर्द न केल्याचा ठपका ठेऊन जिल्हाधिकार्‍यांनी त्यांच्यावर दिवाणी तुरूंगात डांबण्याचे आदेश काढले होते. या आदेशाविरोधात ग्रामसेविका यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे अपील दाखल केल्यानंतर त्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला खंडपीठाने स्थगिती दिली आहे.

कागदपत्रे सुपूर्द केल्याचा दावा
चुंचाळे, ता.यावल येथील ग्रामसेविका प्रियंका बाविस्कर या आधी किन्ही, ता.भुसावळ येथे कार्यरत होत्या व तेथून बदली झाल्यावर त्यांनी ग्रामपंचायतीचे कार्यालयीन दस्तावेज आपल्या उत्तराधिकार्‍यांकडे देण्याबाबत टाळाटाळ केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी त्यांना 30 दिवस दिवाणी तुरूंगवासाच्या शिक्षेचे आदेश पारीत केल्याने खळबळ उडाली होती. या आदेशाच्या विरोधात ग्रामसेविका बाविस्कर यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केले होते व या अपिलात त्यांनी आपली बाजू मांडतांना सांगितले की, 2015 मध्ये किन्ही, ता.भुसावळ येथे ग्रामसेविका म्हणून रूजू झाल्या. किन्ही येथील कार्यकाळ संपल्यानंतर बाविस्कर यांची चुंचाळे, ता.यावल येथे बदली झाली. बदलीनंतर किन्ही येथील ग्रामसेवकपदाचा कार्यभार अगोदर काकरवाल व नंतर संदीप निकम यांच्याकडे सोपवण्यात आला व टप्प्या-टप्प्याने आपल्याकडील सर्व कागदपत्रे नव्या ग्रामसेवकांकडे सुपूर्द केल्याचे त्यांनी सांगीतले. या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाचे न्या.आर.एन.लढ्ढा व एस.व्ही.गंगापुरवाला यांना जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. यामुळे तुर्त ग्रामसेविका प्रियंका बाविस्कर यांना दिलासा मिळाला आहे

पुढील सुनावणी 24 डिसेंबरला
या याचिकेवर प्राथमिक सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने जिल्हाधिकार्‍यांचे आदेश स्थगित केले आहेत. शुक्रवार, 24 डिसेंबर रोजी या प्रकरणी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जळगाव व गटविकास अधिकारी, भुसावळ यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी उपस्थित राहण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात जिल्हाधिकारी यांचा आदेश स्थगित ठेवण्यात येत असल्याचे उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !