जळगावात तरुणाचा खून : अटकेतील दोघा आरोपींची कोठडीत रवानगी
जळगाव : वर्चस्वाच्या लढाईतून झालेल्या हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या पवन उर्फ घातक मुकुंदा सोनवणे याचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला. त्यामुळे प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढवण्यात आले. तत्पूर्वी घातकवरही मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचे मारेकरी सागर पूनम कंडारे व विशाल विजय सपकाळे (दोघे रा. सिद्धार्थनगर) या दोघांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.
मारहाणीत घातकचा मृत्यू
मृत पवन, सागर व विशाल या तिघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. पवन एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हिस्ट्रीशीटर्सच्या यादीत होता. तर सागर व विशाल या दोघांवर प्रत्येकी तीन गुन्हे दाखल आहेत. एकाच परिसरात राहणार्या या तिघांमध्ये वैर होते. अमोल चौधरी नावाच्या तरुणाशी सागर, विशालचे भांडण झाले. त्यातून दोघांनी पवनच्या घराजवळ येऊन दमदाटी, शिवीगाळ केली. त्यामुळे झालेल्या हाणामारीत पवन गंभीर जखमी झाला. सोमवारी पहाटे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर दुपारी दोन वाजता शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. सोमवारी दुपारी पवनवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत पवनच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ व एक विवाहित बहिण असा परीवार आहे. पवनच्या मृत्यूनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त वाढवून गर्दी नियंत्रणात आणली. तसेच पवनवर प्राणघातक हल्ला केल्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेले विशाल व सागर या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीअंती दोघांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली. उपनिरीक्षक दीपक जगदाळे तपास करीत आहेत.





