मध्यप्रदेशातील तरुणाची जळगावात हत्या : आरोपी कल्लूसिंगला जन्मठेपेची शिक्षा
जळगाव : शहरातील मेहरुण परीसरात भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. या घटनेत आसाराम छोटेलाल पवार (30) यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी गुन्ह्यातील आरोपी कल्लूसिंग शंकरसिंग राजपूत (25, रा.तेहासी, ता.खागा, जि.फतेहपूर, उत्तरप्रदेश, ह.मु. शांती नारायण नगर, मेहरूण) यास जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
भांडण सोडवताना घाव लागला वर्मी
मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील हरसूद तालुक्यातील कुंडिया येथील मूळ रहिवासी आसाराम छोटेलाल पवार (30) हे मेहरुण परिसरातील मंगलपूर भागात वास्तव्यास होते. 6 फेब्रुवारी 2011 रोजी सुरेश बंजारा यांचे काही लोकांशी भांडण सुरू असताना आसाराम पवार यांनी भांडण सोडवले मात्र सुरेश बंजारा यांचे जावई कल्लूसिंग शंकरसिंग राजपूत याने त्याच्या हातातील चाकू आसाराम याच्या छातीत मारुन गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत आसारामचा भाऊ दिनेशराव याने जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान असारामचा मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर कल्लूसिंग राजपूत हा पसार झाला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात संशयित आरोपी कल्लूसिंग राजपूत व जितेंद्रसिंग राजपूत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर 8 फेब्रुवारी 2011 रोजी दोघांना अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात दोघांवर खूनाचे कलम वाढविण्यात आले होते.





यांची साक्ष ठरली महत्वाची
हा खटला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी.जगमलानी यांच्या न्यायालयात सुरू होता. खटला सुरूअसतांना तपासधिकारी पोलीस उपनिरीक्षक बी.ए.कदम यांनी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. सरकार पक्षाने या खटल्यात 14 साक्षीदार तपासले. यात मयत आसाराम याची पत्नी, भाऊ, संशयीत आरोपीची सासू, सासरे व मृत्यूपूर्वी जवाब नोंदविणारे कार्यकारी दंडाधिकारी पुरुषोत्तम खैरनार, डॉ.किरण पाटील, डॉ. उमेश वानखेडे व तपासधिकारी पोलीस उपनिरीक्षक बी. ए. कदम यांच्या साक्ष महत्वपूर्ण ठरल्या. न्यायालयाने 14 जणांची साक्ष महत्वपूर्ण ठरवित न्यायालयासमोर सादर केलेल्या पुरव्यांच्या आधारावर न्यायालयाने संशयीत आरोपी कल्लूसिंग राजपूत याला खून केल्याप्रकरणी जन्मठेप व पाच हजार रुपये दंड न भरल्यास तीन महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली. तसेच दुसरा संशयीत आरोपीस जितेंद्रसिंग राजपूत याची निर्दोष मुक्तता केली. खटल्यात सहाय्यक सरकारी वकील प्रदीप एम.महाजन यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. पैरवी अधिकारी म्हणून राजेंद्र सैंदाणे यांनी कामकाज पाहिले.
