वरणगावजवळ पकडली वाहनातून डिझेल चोरी करणारी टोळी : युपीसह ठाण्यातील संशयीत जाळ्यात
जळगाव : वाहनांमधून डिझेलची चोरी करणार्या तिघांच्या टोळीला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. अनेक चोर्या या टोळीकडून उघडकीस येण्याची शक्यता आहे.
ठाण्यासह युपीतील संशयीत जाळ्यात
महामार्गावरील हॉटेल्स, ढाब्यांसमोर उभ्या असलेल्या वाहनांमधून डिझेलची चोरी करणार्या संशयीताबाबत माहिती मिळाल्यानंतर तिघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. संशयीतांकडून 79 हजार रुपये किंमतीचे डिझेल व इतर साहित्य जप्त करण्यात आले. रईस हाशीम शेख (36, रा.गौरीपाडा, भिवंडी), रुबाबअली जलील अहमद (33, रा.मोहुआ बुजुर्ग, जि.उत्तरप्रदेश) व चालक अनिल सुभाष सरोदे (32, रा.आदिवासीपाडा, अंजूर फाटा भिवंडी, ठाणे) असे आरोपींची नावे आहेत.





गोपनीय माहितीवरून टोळी जाळ्यात
मुक्ताईनगर ते भुसावळ दरम्यान महामार्गालगत असलेले हॉटेल्स, ढाब्यांसमोर उभ्या असलेल्या ट्रकमधून डिझेल करणारी टोळी फिरत असल्याची माहिती एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी त्या वाहनाचा शोध घेऊन त्यांच्याकडे चोरीचे डिझेल असल्यास जप्त करून पुढील कारवाई करण्याचे आदेश पथकाला दिलेले होते. या पथकाला वरणगावजवळील खुशाल ढाब्याजवळ वाहनाजवळ दोन व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरताना दिसल्या. पथकाने वाहनात बसलेल्या व आजूबाजूला फिरत असलेल्यांना ताब्यात घेतले. त्यांनी वरणगाव पोलिस ठाण्यातील दोन, भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एक अशा एकूण तीन गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांच्या ताब्यातून 39 हजार 10 रुपये किमतीचे 415 लिटर डिझेल, 40 हजार रुपये किमतीचे डिझेल, चोरी करण्यासाठी लागणारे साहित्य व मालवाहू वाहन जप्त केले आहे. पोलिस उपनिरीक्षक अमोल देवढे, अशोक महाजन, युनूस शेख, सुनील दामोदरे, दीपक पाटील, महेश महाजन, किरण धनगर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
