भुसावळ परीसरात शाळा-महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात
तंदुरुस्ती मानसिक संतुलनासाठी योगाभ्यास करण्याचे मान्यवरांचे आवाहन
भुसावळ : भुसावळ शहरासह विभागातील शाळा, महाविद्यालयांसह सामाजिक संस्थाच्या वतीने मंगळवारी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने योग शिबिराचे आयोजन करण्यात आले तर नागरीकांनी मात्र घरीच योग साधना केली. शाळा, महाविद्यालयांसह विविध संस्थांत योग प्रात्यक्षिके करत शारीरीक आरोग्य जपण्यासाठी व्यायाम, योगासनांवर भर देण्याचे आवाहन मान्यवरांनी केले.
म्युनिसीपल हायस्कूल, भुसावळ
भुसावळ : शहरातील म्युनिसिपल हायस्कूलमध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. प्रथम विद्यार्थी व शिक्षक यांनी प्रभात फेरी द्वारे 21जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे हे समाज बांधवाना सांगितले. कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक ललित कुमार फिरके यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी डॉ.प्रदीप साखरे यांनी जागतिक योग दिनाचे महत्व व योगाचे फायदे याबाबत माहिती दिली. सर्व विद्यार्थ्यासह, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांचय उपस्थितीत पोटावरील योगासने, पाठीवरील योगासने, उभी आसने, बैठी आसने व प्राणायाम करून घेण्यात आला. शिक्षक- शिक्षकेतर कर्मचार्यांनी सहकार्य केले.

झांबरे माध्यमिक विद्यालय, भुसावळ
भुसावळ : दादासाहेब आर.जी.झांबरे माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. योग शिक्षिका ज्योत्स्ना पाटील व विजय पाटील यांनी योगासने सादर केली. मुख्याध्यापक एस.बी.कुमावत, पर्यवेक्षक पी.ए.शुक्ल, एन.एन.झांबरे यांनी मार्गदर्शन केले. क्रीडा शिक्षक एस.डी.बावस्कर यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांनी परीश्रम घेतले.
ताप्ती पब्लिक स्कूल, भुसावळ
भुसावळ : ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी 21 जून हा दिवस योग दिन म्हणून साजरा केला. यावेळी योग शिक्षिका वृशाली गाडगीळ व प्रिन्सिपल नीना कटलर यांनी विद्यार्थ्यांना योग संदर्भात माहिती सांगितली. योगा केल्याने आपल्यात काय बदल होतात याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. भुजंग आसन, वृक्षासन, ताडासन, उत्ताना पादासन, वक्रासन, चक्रासन, मत्स्यासन, शलभासन, सर्वांगासन, त्रिकोणासन करण्यात आले तर प्राणायामचे प्रकार भ्रसिका, अनुलोम-विलोम, कपाल भाती, शीतली शीतकारी, उज्जैय या प्रकारचे योगासन व प्राणायम घेऊन शांती मंत्राने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. शाळेतील शिक्षक व नॉन टीचींग कर्मचार्यांनी यशस्वीतेसाठी प्रयत्न परीश्रम घेतले.
बियाणी मिलिटरी स्कूल, भुसावळ
भुसावळ : बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये जागतिक योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या भव्य प्रांगणात विद्यार्थ्यांनी योगाचे धडे घेतले. याप्रसंगी बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या सचिव डॉ.संगीता बियाणी, संचालिका स्मिता बियाणी, रोनक बियाणी यांनी ही विद्यार्थ्यांसोबत योग प्रात्यक्षिक करून योगाभ्यासाचा आनंद घेतला.
सर्व विद्यार्थी आणि शिक्षक वृंदांनी योगाची प्रात्यक्षिके आत्मसात केली. कार्यक्रमास संस्थाध्यक्ष मनोज बियाणी यांनी शुभेच्छा दिल्या. शाळेचे प्राचार्य डी.एम.पाटील यांनी विद्यार्थ्यांना योगाभ्यासाचे महत्त्व विषद केले. या प्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशन, भुसावळ
भुसावळ : भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा
करण्यात आला. योगा मास्टर पूनम कुलकर्णी यांनी भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनच्या सर्व धावपटू, जलतरणपटू, सायकलपटू व शहरातील इतर नागरिकांना योगाबद्दल माहिती दिली. व्यासपीठावर योगशिक्षिका पूनम भंगाळे, योग शिक्षिका ज्योत्स्ना पाटील व योगशिक्षिका पारुल वर्मा या उपस्थित होत्या. प्रथम वॉर्मअप, त्यानंतर स्टँडिंग योगा, सूर्यनमस्कार, सिटिंग योगा व शेवटी प्राणायाम व ध्यान करण्यात आले. असोसिएशनचे प्रमुख प्रवीण फालक यांच्याहस्ते पूनम कुलकर्णी यांना आयुष मंत्रालयाची लेव्हल -6 ही परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल विशेषत्वे गौरविण्यात आले. सूत्रसंचालन प्रवीण पाटील तर आभार डॉ.नीलिमा नेहेते यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अखिलेशकुमार कनोजिया, रीजवान शेख, सुनील सोनगिरे, छोटू गवळी यांनी विशेष सहकार्य केले.
दुय्यम कारागृह, भुसावळ
भुसावळ : शहरातील दुय्यम कारागृहत जेल 1 एन.एम.कन्यवाड यांच्या उपस्थिती योग दिन कार्यक्रम झाला. प्रसंगी 60 कैद्यांना मनोज कुमार रावत व शीला रावत यांनी योगाचे धडे दिले. कारागृहातील कर्मचारी उपस्थित होते.
ऑर्डनन्स फॅक्टरी, भुसावळ
भुसावळ : ऑर्डनन्स फॅक्टरीत योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळचे (ओ.आय.टी.सी) सुकांता सरकार व दीपशिखा महिला कल्याण समिती उपाध्यक्ष सुदिप्ता सरकार यांच्याहस्ते ओमच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण केले. सुरक्षा अधिकारी सुशीलकुमार व डीजीएम बी.देवीचंद, महिला कल्याण समितीच्या सर्व पदाधिकारी महिलांनी ओमच्या प्रतिमेचे पूजन केले. सर्व अधिकारी, युनियन असोसिएशनचे पदाधिकारी, जेसीएम थ्री जेसीएम फोर्थ मेंबर कार्य समिती सदस्य व डीएससीचे जवान उपस्थित होते. यावेळी योग प्रशिक्षक एम.एस.राऊत यांनी सर्वांना योगसाधने चे धडे दिल्याचे जनसंपर्क अधिकारी बी.देवीचंद यांनी दिली.

