A woman in Jalgaon died after falling from a bike स्पीड ब्रेकरवर दुचाकी येताच जमिनीवर पडल्याने महिलेचा मृत्यू
A woman in Jalgaon died after falling from a bike पाचोरा : गतिरोधकावर दुचाकी आल्यानंतर नियंत्रण सुटल्याने महिलेचा जमिनीवर पडल्याने मृत्यू झाला. सोमवार, 15 रोजी ही घटना पाचोरा तालुक्यातील लोहारी गावाजवळ घडली. सुशीलाबाई दिनकर बडगुजर (64, जळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे.
नवसासाठी जाताना दुर्घटना
प्रमोद दिनकर बडगुजर (रा. सुप्रीम कॉलनी, एम.आय.डी.सी., जळगाव) हे पिंपळगाव (हरेश्वर) येथील आपल्या शालकाच्या मुलाचा नवस असल्याने या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आई सुशीलाबाई यांच्यासह दुचाकी (एम. एच. 19 डी.बी.1188) ने सोमवारी निघाले असता सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील लोहारी गावानजीक त्यांची मोटरसायकल ही स्पिड ब्रेकरवर आदळली. यावेळी मागे बसलेल्या सुशिलाबाई बडगुजर ह्या खाली पडल्याने त्यांच्या डोक्यास जबर मार लागल्याने सुशिलाबाई यांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी सुशिलाबाई बडगुजर यांना मृत घोषित केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ही नोंद शुन्य क्रमांकाने पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात आली.
