सावद्यात 16 मंडळांतर्फे दुर्गा देवी विसर्जन उत्साहात
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त : भाविकांनी दिला भक्तीभावाने निरोप : रात्री दहापर्यंत आटोपली विसर्जन मिरवणूक
सावदा : शहरातील विविध भागात 16 मंडळांतर्फे घटस्थापना करण्यात आल्यानंतर गुरुवार, 6 रोजी सायंकाळी मोठ्या भक्तीपूर्ण व उत्साही वातावरणात मिरवणूक काढून दुर्गा मातेचे विसर्जन करण्यात आले. यंदा दोन वर्षांच्या कालखंडानंतर कुठलेही निर्बंध नसल्याने भाविकांमध्ये मोठ्या आनंदाचे वातावरण होते. रात्री 10 वाजेपर्यंत विसर्जन मिरवणूक आटोपली व तापी नदी पात्रात विसर्जन करण्यात आले.
मिरवणुकीने वेधले लक्ष
दुर्गोत्सव मंडळांतर्फे सवाद्य मिरवणूक काढण्यात आली तसेच संभाजी दुर्गा उत्सव समितीने आगळ्या-वेगळ्या पद्धतीने दुर्गा मातेची मूर्ती असलेला रथ (स्त्री शक्ती) महिलांनी ओढला व आपले वेगळेपण जपले. दुर्गा विसर्जन मिरवणुकीत आदर्श, बाल दुर्गा, दुर्गा उत्सव समिती, भारत, अजिंक्य, मरी माता, एकता, संघर्ष, जय माता दी, छत्रपती संभाजी, सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळ, मातारानी, शिवदुर्गोत्सव मंडळ, न्यू एकता, माँ भवानी, नवयुवक असे 16 मंडळ सहभागी झाले. काही मंडळांनी दुपारीच विसर्जन केले तर उर्वरीत मंडळे पूर्ण प्रदक्षिणा करीत विसर्जन मिरवणूक काढली. मिरवणूक पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरीकांची गर्दी झाल्याने शहराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले.

पोलिसांचा काटेकोर बंदोबस्त
सावदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक देविदास इंगोले, मुख्याधिकारी किशोर चौहान, एसआरपी पथक, अतिरीक्त फिरते पथक, पोलिस कर्मचारी तसेच गृहरक्षक जवानांनी बंदोबस्त राखला. देवीभक्तांसाठी मसाले काजू, मनुखा, बदाम मिश्रीत स्वादिष्ट मसाले भाताची मेजवानी संकल्प सिद्धी श्री राम गणेश मंदिर, सावदा येथील संचालक व उद्योजक शाम अकोले व अकोले परीवारातर्फे देण्यात आली.
