माणूस हाच बुद्धांच्या धम्माचा केंद्रबिंदू : जयसिंग वाघ
भुसावळ : सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी माणसाच्या जीवनाचा अभ्यास केला.त्याच्या जीवनातील सुख -दुःखांचा अभ्यास करून मानवाला दुःख मुक्तीचा विचार सांगून मानवाच्या सर्वांगीण विकासाचा सम्यक मार्ग सांगितला. बुद्धांच्या धम्माचा केंद्रबिंदू माणूस हाच राहिला आहे. मानवाच्या सन्मानाचा मार्ग दाखविणारे तथागत बुद्ध विज्ञान व बुद्धीप्रामाण्य वादाचे जनक आहेत, असे प्रतिपादन आंबेडकरी साहित्य व धम्म चळवळींचे अभ्यासक जयसिंग वाघ यांनी केले. ते प्रागतिक विचार मंच, भुसावळ या संस्थेने दीपनगर येथे आयोजित केलेल्या ‘धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्या’ निमित्ताने आयोजित केलेल्या मैत्री सोहळा कार्यक्रमात बोलत होते.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
दीपनगर येथील धम्मदीप विहारात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्रागतिक परीवाराचे अध्यक्ष जे.पी.सपकाळे तर प्रमुख पाहुणे म्हणून भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य उपअभियंता सुनील रामटेके, डॉ.वंदना वाघचौरे, अलका जे.सपकाळे (भुसावळ), प्रा.डॉ.दिलीप तायडे (फैजपूर), रामकृष्ण सुरवाडे (जाडगाव), प्रा.डॉ.सुरेश बच्छाव (भुसावळ), महेंद्र तायडे (सुदगाव), मुकुंदा बार्हे (उदळी), नितीन सोनवणे (दीपनगर) आदी मान्यवर उपस्थित होते.


माणूसच स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार
जयसिंग वाघ पुढे म्हणालेत की, तथागत बुद्ध केवळ दुःख मुक्तीचा मार्ग सांगत नाही तर व्यक्तीच्या विकासाला पूरक ठरणार्या स्वातंत्र्य,समता व बंधूंतेचा ही कृतीयुक्त पुरस्कार करतात. मी सांगतो म्हणून तुम्ही खरं मानू नका तर प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या व विवेकाच्या अंगाने तपासा, तुमच्या बुद्धीला पटली तर स्वीकारा अन्यथा सोडून द्या.! ज्ञान, शील आणि करुणा यांनी जीवन जगा. माणूसच स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार आहे. तुमचे भविष्य तुम्हीच विवेकाने, बुद्धीने व ज्ञानाने घडूवू शकतात .हे सांगणारे तथागत बुद्ध मानवाच्या जीवनाच्या विकासाचे शिल्पकार ठरतात .
शीलवान होवून पुण्यकर्म करा
जे.पी.सपकाळे सर यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म ही जीवन जगण्याची आदर्श विचार धारा आहे. आदर्श माणूस निर्माण करण्याची ताकद बौद्ध तत्वज्ञानात असल्याचे सांगून आपण अधिका अधिक ज्ञानी व शीलवान होऊन पुण्यकर्म करावे असे आवाहन केले.
मान्यवरांचा विशेष सन्मान
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला. यात उद्योग निर्मिती क्षेत्रामधून दीपरत्न तायडे व निलेश रायपुरे (भुसावळ), सामाजिक क्षेत्रामधून मोहन सरदार (मानव सेवा संस्था, दीपनगर) व सुरेखा सरजू तायडे (ग्रा.पं.सदस्य, कंडारी) तर शैक्षणिक क्षेत्रामधून समाधान जाधव (प्राथमिक शिक्षक, शिंदी) आदींचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मोहन सरदार (सेफ्टी ऑफिसर ,दिपनगर) तर आभार निलेश रायपुरे यांनी मानले. सूत्रसंचलन विनोद बार्हे यांनी केले.
यांचे यशस्वीतेसाठी परीश्रम
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोहन सरदार, प्रा.डॉ.जतीन मेढे, समाधान जाधव, प्रशांत नरवाडे, दिलीप सुरवाडे, देवेंद्र तायडे, निलेश रायपुरे, प्रशांत तायडे, अनिल बागुल, वाल्मिक देहाडे, संघरत्न सपकाळे आदींनी परीश्रम घेतले.