भुसावळकरांना वेळेवर वीज बिलांअभावी भूर्दंडाचा शॉक

मुख्य अभियंत्यांना तक्रार : वेळेत देयके न देणार्‍या रीडींग एजन्सीवर कारवाई करण्याची प्रा.धीरज पाटील यांची मागणी


Bhusvalkars shocked by lack of timely electricity bills भुसावळ : वीज महावितरणच्या मनमानी कारभाराचा त्रास भुसावळ तालुक्यासह शहरातील वीज ग्राहकांना होत आहे. बहुतांश वीज ग्राहकांना ऑक्टोंबर 2022 ची वीज देयके मिळाली नाहीत तर काही ग्राहकांना नेहमी अंतिम देयक दिनांकानंतर येत आहेत. परीणामी वेळेत बिल घरी न आल्याने ग्राहकांना वारंवार नाहक अतिरिक्त दंड भरावा लागत आहे. वीज वितरण कार्यालयाकडून त्यांच्या तक्रारीची दखलही घेतली जात नसल्याचा आरोप शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी केला आहे. शहरात वेळेत मीटर रिडींग न घेणार्‍या तसेच वीज देयके वाटप न करणार्‍या संबंधित एजन्सीवर कारवाई करण्याची मागणी प्रा.धीरज पाटील यांनी मुख्य अभियंत्याकडे केली आहे.

वीज ग्राहकांना नाहक भुर्दंड
वीज वितरण कंपनीकडून देण्यात येणार्‍या वीज देयकावर देयक दिनांक टाकण्यात येतो. हा देयक दिनांक म्हणजे ज्या वेळी वीज बिल सिस्टीममध्ये तयार होते ती तारीख असते. साधारण या तारखेच्या दहा दिवसांमध्ये ग्राहकांच्या घरी वीज बिल येणे अपेक्षित असते. अंतिम देयक दिनांकापासून बिल भरण्याची अंतिम तारीख घरगुती, व्यापारी आणि औद्योगिक ग्राहकांसाठी वेगवेगळी असते परंतु तोपर्यंतही अनेक ग्राहकांकडे वीज बिल पोहोचत नसल्याने ग्राहकांना दंडाची रक्कम भरावी लागते. दंडाची रक्कम वीज देयकाच्या रकमेवरून ठरते. दहा रुपयांपासून पुढे कित्येक रुपये दंड आकारला जातो. परीणामी वीज बिल वितरक ठेकेदाराने घरी वीज बिल उशिरा आणल्याने कोणतीही चूक नसताना वीज ग्राहकांना दंडाचा भुर्दंड सोसावा लागत आहे.



जेष्ठ नागरीकांना त्रास
अनेक ग्राहकांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही. तर काही ज्येष्ठ नागरीकांना वीज देयकासाठी महावितरणच्या दोन मजली कार्यालयात जावे लागते. वय जास्त असल्याने फेर्‍या मारतांना त्रास होतो. अश्या अनेक तक्रारी ज्येष्ठ नागरीकांनी केल्या आहेत. महावितरण कंपनीने वीज देयक वितरीत करण्यासाठी ठेकेदारांची नेमणूक केली आहे. संबंधित ठेकेदाराचे कर्मचारी अरेरावीची भाषा करतात. काही ग्राहकांची अशी तक्रार आहे की मुद्दामहून त्यांना उशिरा बिल दिले जाते. असे प्रकार वारंवार होत असल्याने ग्राहकांमध्ये वीज वितरण कंपनीबाबत प्रचंड राग व असंतोष निर्माण झाला असून या सर्व बाबींवर योग्य कारवाई न केल्यास भुसावळ तालुक्यातील वीज ग्राहक महावितरणविरोधात लवकरच आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत, असे तक्रारीत म्हटले आहे.

संयुक्त बैठक लावण्याची मागणी
महावितरण अधिकारी, ठेकेदार व ग्राहकांची एक संयुक्त बैठक लावावी, नागरीकांना होणार्‍या अडचणी यात मांडल्या जातील. सोबत खरंच ठेकेदार योग्य काम करीत आहे की नाही हेही समोर येईल. महावितरणच्या अधिकार्‍यांनी ठेकेदारांना याबाबतीत सूचना करावी, असे प्रा.धीरज पाटील यांनी कळवले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !