भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनतर्फे 5 मार्च रोजी लेडीज रन


भुसावळ : भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशन द्वारा यावर्षी देखील जागतिक महिला दिनानिमित्त ‘बीसारा लेडीज इक्वॅलिटी रन’चे आयोजन 5 मार्च रोजी करण्यात आले आहे. यंदा आयोजनाचे तिसरे वर्ष आहे. यासंबंधीची माहिती प्रवीण फालक यांनी दिली आहे. प्रसंगी डॉ.चारुलता पाटील, प्रवीण वारके, प्रवीण पाटील उपस्थित होते.

महिला धावपटूंना आगळी-वेगळी भेट
यंदाच्या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे यावेळी सर्व पुरुष धावपटू ही स्पर्धा आयोजित करणार असून संघटनेच्या सर्व महिला धावपटूदेखील नवीन सहभागी स्पर्धकांसोबत धावणार असल्याने जागतिक महिला दिना निमित्ताने पुरुष धावपटूंतर्फे महिला धावपटूंना आगळीवेगळी भेट दिली जाणार आहे. 3 किमी, 5 किमी व 10 किमी या तीन गटात फक्त महिला व विद्यार्थिनींसाठी स्पर्धा होईल तसेच पाच किमी व दहा किमीच्या अंतरासाठी महिला धावपटूंना टाईमिंग चीप दिली जाणार आहे. रन संपल्याबरोबर या गटातील धावपटूंना आपले निर्धारीत अंतर किती वेळेत पूर्ण झाले याचा संदेश ताबडतोब मोबाईलवर मिळेल. त्याशिवाय प्रमाणपत्र देखील मिळेल जे विविध स्पर्धा परीक्षांच्या मैदानी खेळासाठी उपयोगात येईल, अशी माहिती आयोजकांनी दिली.



सहभागी धावपटूला मिळणार पदकासह टी शर्ट, प्रमाणपत्र
सहभागी प्रत्येक महिला धावपटूस आयोजकांतर्फे पदक, टी-शर्ट, प्रमाणपत्र, धावण्याच्या रस्त्यावर पेयजलाची व्यवस्था व नाश्ता दिला जाणार आहे त्याशिवाय सहभागी स्पर्धकांना भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनतर्फे संपूर्ण फेब्रुवारी महिना निःशुल्क धावण्याचे प्रशिक्षण दिले जाणार असून यासाठी नाव नोंदणी ऑनलाइन व ऑफलाइन फॉर्म भरून करता येईल. ऑफलाइन फॉर्म भुसावळ रनर्सच्या महिला धावपटूंकडे उपलब्ध असतील व ऑनलाइन फॉर्म संघटनेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी माधुरी चौधरी, दीपा स्वामी, माया पवार, मंजू शुक्ला, मोनिका देशमुख या महिला धावपटूंनी आपले अनुभव कथन केले. याप्रसंगी प्रियंका मंत्री, डॉ.स्वाती फालक, स्वाती भोळे, प्रणोती पाटील, विजया पाटील, मनीषा वशिष्ठ, निर्मला सोनवणे, वर्षा वाडिले आदी महिला धावपटूंसोबतच प्रकाश अटवाणी, सचिन मनवानी, कैलास छाब्रा, राजेंद्र ठाकूर, राकेश चौधरी, श्रीकांत नगरनाईक, राजीव यादव, मुकेश चौधरी, संतोष घाडगे, तरुण बिरीया, विजय फिरके, प्रशांत वंजारी, ताराचंद खरारे, जितेंद्र पाटील, अखिलेश कनोजिया, अभिजीत शिंदे, संजय भदाणे, डॉ.निर्मल बलके, आनंद सपकाळे हे धावपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !