टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये भुसावळ रनर्सच्या धावपटूंचा सहभाग


भुसावळ : भारतातच नव्हे तर जगप्रसिद्ध असलेली टाटा मुंबई मॅरेथॉन नुकतीच झाली. या स्पर्धेत 42 किमी पूर्ण मॅरेथॉन, 21 किमी अर्ध मॅरेथॉन, 10 किमी रन, ड्रीम रन, सीनियर सिटीजन रन आदी वेगवेगळ्या गटात तब्बल 55 हजाराहून अधिक धावपटू एकत्र धावले. प्रतिष्ठित मॅरेथॉनमध्ये भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनच्या तब्बल 20 धावपटूंनी यशस्वी सहभाग नोंदविला.

यांनी नोंदवला यशस्वी सहभाग
यात 42 किमीच्या पूर्ण मॅरेथॉन गटात संजय भदाणे, विजय फिरके, तरुण बिरीया, मुकेश चौधरी, संदीप कुमार वर्मा, उमेश घुले, डॉ. तुषार पाटील, युवराज सूर्यवंशी, प्रदीप सोलंकी, गणसिंग पाटील, प्रवीण वारके या 11 धावपटूंनी यशस्वी सहभाग नोंदविला. शिवाय 21 किमी अर्ध मॅरेथॉनमध्ये डॉ. नीलिमा नेहेते, डॉ.चारुलता पाटील, डॉ.स्वाती फालक, राजेंद्र ठाकूर, जितेंद्र चौधरी, सुरेश सहानी, संतोष मोटवानी, सुधाकर सनांसे या 8 धावपटूंनी तर 10 किमी रनमध्ये मीना नेरकर यांनी यशस्वी सहभाग नोंदविला. 42 किमी गटात नाव नोंदणी केलेल्या प्रवीण फालक व प्रवीण पाटील प्रकृती अस्वास्थामुळे प्रत्यक्ष सहभागी होऊ शकले नाहीत परंतु स्पर्धेच्या दिवशी संपूर्ण वेळ त्यांनी आपल्या धावपटूंसोबत राहणे पसंत केले. त्याचबरोबर इसाक गवळी व संदीप सुरवाडे हे धावपटू देखील सहभागी धावपटूंचा उत्साह वाढवण्यासाठी खास भुसावळहून आले होते.

सरावाचे झाले चीज : धावपटूंची भावना
21 किमीची मॅरेथॉन माहिम येथील रेती बंदर येथून तर 42 किमी मॅरेथॉन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाबाहेरून ठिक 5.15 वाजता सुरू झाली. रस्त्याच्या दुतर्फा आबालवृद्ध मुंबईकर धावपटूंसाठी पेयजल, बिस्किट, चॉकलेट, वेगवेगळे फळे आदींची व्यवस्था करताना ’हर दिल मुंबई’ या मॅरेथॉनच्या ब्रीद वाक्याचे आठवण करून देत होते. सुरुवात वेगवेगळ्या ठिकाणाहून असली तरी मुंबईच्या आझाद मैदानावर सर्व धावपटूंचा रन संपवून जेव्हा पदक गळ्यात पडले त्यावेळी गेल्या चार महिन्यांपासून केलेल्या सरावाचे चीज झाले अशी भावना गणसिंग पाटील व प्रवीण वारके या धावपटूंनी यावेळी बोलून दाखवली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !