जळगावातील पुतळा विटंबना प्रकरणी दोन संशयीतांना अटक
जळगाव : शहरातील दीक्षीतवाडी परीसरात असलेल्या तथागत भगवान गौतम बुध्द आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची विटबंना केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात दाखल गुन्ह्यात दोन संशयीतांना गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी अटक केली. प्रशांत शरद देशपांडे आणि अमित एकनाथ पाटील (दोन्ही रा.जळगाव) अशी अटकेतील संशयीतांची नावे आहेत.
आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी
जळगाव शहरातील दीक्षितवाडी परीसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची स्थापना गेल्या 30 ते 35 वर्षांपासून करण्यात आली असतानाही जागा खाजगी असल्याने जागा मालक प्रशांत शरद देशपांडे आणि अमित एकनाथ पाटील (दोन्ही रा. जळगाव) यांनी 16 मार्च रोजी सकाळी सात वाजता जेसीबीद्वारे पुतळा हटवण्याचा प्रयत्न केला होता. समाज बांधवांनी पुतळ्याच्या ठिकाणी आणि जिल्हापेठ पोलिसात तीव्र आंदोलन केल्यानंतर जिल्हापेठ पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मूर्ती आणि पुतळा त्याच ठिकाणी पुनर्स्थापीत करण्यात आला होता. या प्रकरणातील संशयित प्रशांत देशपांडे आणि अमित पाटील यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी अनेक संघटनांनी आंदोलन केल्यानंतर सोमवार, 10 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता त्यांना अटक करण्यात आली. दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडीचे हक्क राखीव ठेवून दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल अॅड.सुरेंद्र काबरा यांनी युक्तीवाद केला.
