यात्रेतील गोंगाटात हटकल्याचा राग : टाकरखेडा येथे यात्रेत दोघांना मारहाण
यावल : तालुक्यातील टाकरखेडा येथे विठ्ठल मंदिराच्या जवळ सहा ते सात जण यात्रेत गोंगाट करीत असल्याने त्यांना हटकल्यानंतर सात जणांनी दोघांना जबर मारहाण करीत एकाच्या डोक्यात दुखापत केली. या प्रकरणी यावल पोलिसात दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सात संशयीतांविरोधात गुन्हा
टाकरखेडा, ता. यावल येथील अनिल रमेश महाजन यांनी यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, टाकरखेडा गावात यात्रा असल्याने विठ्ठल मंदिराच्या समोर पवन रामकृष्ण सोनवणे व त्यांच्यासोबत सहा जण (रा. पिंप्री, ता.यावल) हे गोंधळ घालत होते. त्यांना हटकले असता या सर्व सात जणांनी अनिल रमेश महाजन व त्यांच्या भाऊ यांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली व अनिल महाजन यांच्या डोक्यात दुखापत केली. जखमी अवस्थेत अनिल महाजन यांना यावल रुग्णालयात आणण्यात आल्यानंतर त्यांनी फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहे.
