मेगा रीचार्ज योजनेचा खासदार खडसेंकडून तपशीलवार आढावा
Detailed review of Mega Recharge Yojana by MP Khadse मुक्ताईनगर : मेगा रीचार्ज योजनेचा खासदार रक्षा खडसे यांनी तपशीलवार आढावा तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयात घेतला. योजनेच्या भूमिपूजनासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे खासदार म्हणाल्या. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्यांचा महत्त्वाकांक्षी आंतरराज्य मेगा रीचार्ज प्रकल्प योजनेचा दोन्ही राज्यांद्वारे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झालेला असून याबाबत केंद्रीय जलशक्ती मंत्रालय कडून मेगा रीचार्ज योजनेचा तपशीलवार आढावा घेण्यासाठी आणि महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश यांच्यातील पाणी वाटप अंतिम करण्यासाठी दोन्ही राज्यांची संयुक्त बैठक घेण्यात यावी याबाबत खासदार रक्षा खडसे यांची केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची गत आठवड्यात भेट घेऊन मागणी केली होती.
नियोजनाबाबत अधिकार्यांकडून जाणली माहिती
मेगा रीचार्ज योजनेच्या डीपीआरबाबत माहिती घेण्यासाठी गुरुवारी खासदार रक्षा खडसे यांनी तापी विकास महामंडळ, जळगांव येथे भेट देऊन पुढील नियोजनाबाबत प्रमुख अधिकार्यांकडून माहिती घेतली. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्यासोबत खासदार रक्षा खडसे यांच्या दिल्ली येथील भेटीत लवकरच डीपीआरवर तपशीलवार आढाव्यासाठी बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश दोन्ही राज्यांचा पाणी वाटपाबाबत सुद्धा नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले, बैठक लवकरच होण्यासंदर्भात केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत तसेच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांना विनंती करणार असल्याचे खासदार म्हणाले. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीष महाजन यांची भेट घेऊन खासदार मागणी करणार आहेत. यावेळी तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगावचे अधीक्षक अभियंता य.का.भदाने, कार्यकारी अभियंता जी.एस.महाजन, कार्यकारी अभियंता यु.डी.दाभाडे, उपविभागीय अभियंता के.पी.पाटील आदींची उपस्थिती होती.
