शिरपूर तालुक्यातील तरुण विवाहितेची लग्नाच्या तिसर्‍याच दिवशी निर्घृण हत्या : शिरपूरच्या आरोपीला जन्मठेप

धुळे सत्र न्यायालयाचा निकाल : मयतासोबतची सेल्फी ठरली खटल्यातील महत्त्वाचा दुवा


Heinous murder of a young married woman in Shirpur taluka on the third day of marriage: Accused of Shirpur gets life imprisonment शिरपूर : शिरपूर तालुक्यातील जातोडा येथील रहिवासी रेणुका धनगर या तरुणीचा 25 मार्च 2019 रोजी सकाळी पावणेदहाला शिरपूर फाट्यावरील संगीता लॉन्समधील रुम नं.109 मध्ये गळा चिरुन खून करण्यात आला होता. विवाहिता लग्न करून माहेरी परतल्याच्या तिसर्‍याच दिवशी ही घटना घडली होती. या खून प्रकरणी संशयित नरेंद्र एकनाथ भदाणे उर्फ पप्पू शेटे याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. आरोपीसोबत तरुणीने विवाह न केल्याच्या वादातून ही घटना घडली होती.

खुनानंतर आरोपीनेच दिली होती कबुली
23 मार्च 2019 रोजी रेणुकाचा विवाह झाल्यानंतर ती माहेरी आली होती मात्र 25 मार्च रोजी सकाळी आठ वाजता विवाहिता बाहेर पडली व तिचा मोबाईलही घरी राहिला. संशयिताने तिला दुचाकीवरून संगीता लॉन्समध्ये नेले. तेथे तिच्यासोबत फोटो काढला. त्यानंतर सोबत आणलेल्या चाकूने तिचा गळा कापला व त्यानंतरही तिच्या मृतदेहाचेही संशयिताने फोटो काढले. त्यानंतर सकाळी साडेअकराला विवाहितेच्या मोबाईलवर फोन करुन त्याने मी पप्पू शेटे बोलत असून मी रेणुकाचा खून केल्याची कबुलीही दिली होती.

छायाचित्र ठरले महत्त्वाचा पुरावा
शिरपूरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी गुन्ह्याचा अत्यंत बारकाईने तपास केला. साक्षीदार असलेल्या महिलेचे कोविडमुळे निधन झाले तर दोन साक्षीदार उलटले मात्र मोबाईलमध्ये रेणुकाच्या मृत्यूपूर्वी सोबत काढलेले छायाचित्र, रक्ताचे डाग असलेला शर्ट हा महत्त्वाचा पुरावा या खटल्यात ठरला. फिर्यादी, घटनास्थळाचे पंच, डॉक्टर, टेक्नीशीयन, फोटोग्राफर, मोबाईल तज्ज्ञ आदी दहा साक्षीदारांच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या. सरकारी वकिल अ‍ॅड.देवेंद्रसिंह तंवर यांनी प्रभावी युक्तिवाद केल्यानंतर सत्र न्यायाधीश ए.एच.सय्यद यांनी संशयिताला जन्मठेपेची शिक्षा तसेच दहा हजारांचा दंड सुनावला. अ‍ॅड.तंवर यांना अतिरीक्त सरकारी अभियोक्ता संजय मुरक्या, अ‍ॅड.सोनवणे, अ‍ॅड.भोईटे तसेच अ‍ॅड.मयूर बैसाणे, अ‍ॅड.प्रेम सोनार व गुन्हे शाखेचे कॉन्स्टेबल संदीप पाटील यांचे सहकार्य लाभले. या गुन्ह्याचा तपास शिरपूरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी केला.


कॉपी करू नका.