श्री विठ्ठलाच्या जयघोषात भुसावळातून वारकरी रेल्वेने पंढरपूरला रवाना

खासदारांसह आमदारांनी दाखवली हिरवी झेंडी : वारकर्‍यांमध्ये उत्साह : दिंडीने वेधले लक्ष


With the cheers of Shri Vitthala ; Varkari Railway left for Pandharpur from Bhusawal भुसावळ : श्री विठ्ठल नामाचा गजर करीत सावळ्या विठ्ठलाच्या भेटीची आस लागलेले हजारो वारकरी विशेष रेल्वेद्वारे भुसावळ रेल्वे स्थानकावरून बुधवार, 28 जून रोजी दुपारी दोन वाजता पंढरपूरकडे रवाना झाले. सालाबादाप्रमाणे खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नातून विशेष रेल्वेचे बुकींग करण्यात आल्यानंतर दुपारी दिड वाजता केला सायडींगपासून लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत श्री विठ्ठल रूखूमाईच्या मूर्तीची टाळ व मृदुंगाच्या गजरात व भजने म्हणत वारकर्‍यांनी दिंडी काढली. रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्मवर क्रमांक आठवर ही दिंडी पोहोचल्यानंतर पूजन करण्यात आल्यानंतर श्री विठ्ठलाचा जयघोष करण्यात आला. खासदार खडसे व आमदार संजय सावकारे यांनी दोन वाजता विशेष गाडीला हिरवी झेंडी दाखवल्यानंतर ही गाडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली.

भुसावळ विभागातून दिड हजार भाविक रवाना
खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नातून दरवर्षी भाविकांसाठी मोफत पंढरपूर वारीसाठी रेल्वे आरक्षीत केली जाते. यंदादेखील विशेष रेल्वे आरक्षित करण्यात आल्यानंतर बुधवारी दुपारी एक वाजताच भुसावळसह रावेर, यावल, बोदवड, मुक्ताईनगर, जामनेर, मलकापूर आदी भागातील सुमारे दिड हजाराहून अधिक वारकरी रेल्वे स्थानकावर दाखल झाले होते. गाडी रेल्वे स्थानकावर येताच वारकर्‍यांची आसन मिळवण्यासाठी गर्दी केली.

दिंडीने वेधले लक्ष
रेल्वेच्या केला सायडींग भागातून श्री विठ्ठल-रूखूमाईच्या मूर्तीची टाळ, मृदुंग व भजनाच्या गजरात दिंडी (मिरवणूक) काढण्यात आली. यावेळी भाविक भजनांमध्ये दंग झाले होते. रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक आठवर ही दिंडी पोहोचल्यानंतर लोकप्रतिनिधींनी मूर्तीचे पूजन केले. यावेळी प्रत्येक डब्याजवळ जावून लोकप्रतिनिधींनी वारकर्‍यांची विचारपूस करीत त्यांना निरोप दिला. यावेळी खासदार खडसे यांच्यामार्फत सुमारे दिड हजाराहून अधिक वारकर्‍यांना मोफत पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, आमदार व जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे, प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, प्रमोद सावकारे, युवराज लोणारी, गिरीश महाजन, सतीश सपकाळे, मुकेश पाटील, संदीप सुरवाडे, तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, रमाशंकर दुबे, उमेश फेगडे व विलास चौधरी (यावल), शैलजा पाटील, अलका शेळके, युवा मोर्चा शहराध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !