सप्तशृंगी घाटात बस अपघातात महिलेचा मृत्यू : वारसाला एस.टी.तर्फे दहा लाख
जखमींवर शासकीय खर्चाने उपचाराचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश
Death of a woman in a bus accident at Saptshringi Ghat : 10 lakhs by ST to the heirs मुंबई : नाशिकमधील कळवण (नाशिक) येथे सप्तशृंगी गड घाटात एस.टी. बसच्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या अमळनेर तालुकयातील महिलेच्या वारसाला दहा लाख रुपयांची मदत एसटी महामंडळामार्फत देण्यात येणार आहे. या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी अपघातानंतर घटनास्थळी धाव घेतली.
21 प्रवास जखमी : एक ठार
खामगाव आगाराची बस सप्तशृंगी गडावरून बुधवारी सकाळी खामगावच्या दिशेनं निघाली असताना घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट 400 फुट दरीत कोसळली. बसमध्ये 22 प्रवासी होते तर या अपघातात एक महिला ठार झाली असून 21 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. गडावरील स्थानिक रहिवाशी आणि शासकीय यंत्रणांकडून मदतकार्य सुरू झालं आहे.

जखमी प्रवाशांना वणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींना प्राथमिक उपचार करून नाशिक येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. पाच रुग्णांना नाशिक येथे हलविण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
