निंभोरा पोलिसांची मोठी कारवाई : तीन घरफोड्यांची उकल खिर्डीतील पाच आरोपींच्या टोळीला बेड्या

सहा लाख 16 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल जप्त : गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता


रावेर (बुधवार, 23 सप्टेंबर 2026) : निंभोरा पोलिसांनी वाढत्या घरफोडीच्या अनुषंगाने मोठी कारवाई करीत तब्बल तीन घरफोडी करणार्‍या पाच जणांच्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. अटकेतील आरोपी खिर्डीतील रहिवासी असून त्यांच्याकडून तीन गुन्ह्यातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम मिळून एकूण सहा लाख 16 हजार 810 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

खिर्डीतील तीन घरफोड्यांची उकल
निंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खिर्डीतील शहनाज शेख अख्तर या कुटुंबासह बाहेरगावी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी 13 ते 14 सप्टेंबर 2026 दरम्यान त्यांच्या घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम मिळून सहा लाख 32 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल लांबवला होता शिवाय अन्य दोन घरफोड्याही खिर्डीत झाल्याने या प्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. निंभोरा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांनी पथकासह तपासाची सूत्रे हाती घेत गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे खिर्डीतील चार चोरटे निष्पप्न करीत अन्य एकाला मुंबईतून बेड्या ठोकल्या.

या आरोपींना अटक
अटकेतील आरोपींमध्ये नवाज शेख शरीफ (23), अशपाक उर्फ अट्ट्या शेख रमजान (32), शहादत बेग रफिक बेग (22), चेतन लिलाधर जाधव (29) आणि शाकीब बेग साबीर बेग (32, सर्व रा.खिर्डी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पथकाने सुरूवातीला नवाज शेख याची चौकशी केल्यानंतर टोळीचा उलगडा झाला. आरोपी शहादत बेग यास मुंबईतून अन्य चौघांना खिर्डीतून अटक करण्यात आली.

तीन गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त
आरोपींनी खिर्डी येथे झालेल्या तीन्ही घरफोड्यांची कबुली दिली. गुरनं.186/2026 मध्ये पाच लाख 79 हजार 310 तर गुरनं.174/2026 मध्ये 10 हजार 500 रुपयांचे सोने तसेच गुरनं.193/2026 मध्ये 27 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एकूण सहा लाख 16 हजार 810 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम जप्त करण्यात आली.

यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली निंभोरा सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक ए.एम.ढाकणे, ममता आर.तडवी, हवालदार रिजवान पिंजारी, हवालदार अविनाश पाटील, सुभाष शिंदे, परेश सोनवणे, किरण जाधव, सर्फराज तडवी आदींच्या पथकाने केली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !