आमदार एकनाथराव खडसेंच्या जावयाला अखेर जामीन मंजूर
MLA Eknathrao Khadse’s son-in-law finally granted bail जळगाव : आमदार एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळ्याच्या आरोपानंतर गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली मात्र दिड वर्षांपासून त्यांना दिलासा मिळालेला नव्हता. जामिनासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केल्यानंतर अखेर तो मंजूर करण्यात आला.
असे आहे नेमके प्रकरण
देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये एकनाथराव खडसे हे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप होता. 31 कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा करण्यात आला. याप्रकरणी ईडीने आधी त्यांची चौकशी केली होती. यानंतर 7 जुलै 2021 पासून त्यांचे जावई गिरीश दयाराम चौधरी हे अटकेत होते. गिरीश चौधरी यांचा जामीन अर्ज आधीदेखील फेटाळण्यात आला होता. यानंतर एप्रिल महिन्यात पुन्हा त्यांचा अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला होता. यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला होता.

या अर्जावर शुक्रवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यात आज त्यांना कोर्टाने जामीन मंजूर केला असून याबाबत एका वाहिनीने वृत्त दिले आहे.
