गोंडगाव घटनेप्रकरणी खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात येणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील
आरोपीचे घर पाडण्याबाबत पोलीस अधीक्षकांशी चर्चा
The case related to the Gondgaon incident will be tried in the fast track court: Guardian Minister Gulabrao Patil जळगाव : भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील पीडीत बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने आरोपीला फाशीची सजा देण्यासाठी ही केस जलदगती न्यायालयात चालवून एक महिन्याच्या आत निकाल लावण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याची ग्वाही राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी येथे दिली. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षकांशी त्यांनी दूरध्वनीवरून चर्चा करीत आरोपीचे घर पाडण्याबाबत चर्चा केली. ‘कोणावरही अत्याचार करण्याची हिंमत कोणाला होणार नाही, असा संदेश राज्यभर गेला पाहिजे,’ अशी कारवाई करण्याची सूचनाही त्यांनी थेट गोंडगावहून भ्रमणध्वनीद्वारे दिली. पोलिस अधीक्षक राजकुमार यांनी घर अनधिकृत आणि ग्रामपंचायतीचा ठराव असेल तर पाडता येते, असे यावेळी सांगितले.
पालकमंत्र्यांची सांत्वनपर भेट
भडगाव तालुक्यातील सात वर्षीय बालिकेची अत्याचार करून हत्या करण्यात आली होती व त्यानंतर तिचा मृतदेह गुरांच्या गोठ्यात लपवून ठेवल्याची अमानवी घटना 30 जुलै रोजी घडली होती. या खूनप्रकरणी स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील (19) याला अटक करण्यात आली. या घटनेची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही शनिवार, 5 ऑगस्ट रोजी बालिकेच्या कुटुंबाशी दूरध्वनीवरून संवाद साधला होता. रविवारी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गोंडगाव येथे त्या पीडीत कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार किशोर पाटील, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, स्थानिक गावकरी व पदाधिकारी उपस्थित होते.

फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवणार
पालकमंत्रीपाटील म्हणाले, पीडिताच्या कुटुंबाचे शासनाच्या वतीने पुनर्वसन तर करण्यातच येईल मात्र त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन बांधील आहे. आठ दिवसांच्या आत या घटनेत चार्जसीट दाखल करत हा गुन्हा फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून महिनाभरात निकाल लावण्यात येईल.
शासन या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. या कुटुंबास लवकरात लवकर घरकुल योजनेचा लाभ ही देण्यात येईल. असे ही पालकमंत्री श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.
‘ते’ गुन्हे मागे घ्यावेत : पालकमंत्री
पालकमंत्र्यांनी यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. या घटनेनंतर आरोपीला अटक करून घेऊन जाताना गावकर्यांकडून उत्स्फूर्तपणे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाली होती. पोलीस व्हॅनवर अनावधानाने दगडफेकीची घटना झालेली होती यावर पोलीस विभागाने चार ते पाच गावकर्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. गावकर्यांवर दाखल गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशा सूचना पालकमंत्रीपाटील यांनी पोलीस अधीक्षकांना यावेळी दिले.
