पाचोरा शहरात 26 रोजी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री येणार
शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत लाभार्थींना विविध दाखल्यांचे होणार वाटप
Chief Minister along with Deputy Chief Minister will come to Pachora city on 26th पाचोरा : पाचोरा शहरात शनिवार, 26 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री येत असल्याची माहिती आमदार किशोरआप्पा पाटील यांनी पत्रकार परीषदेत दिली. आमदार किशोर पाटील यांनी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परीषदेत कार्यक्रमाबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या अंतर्गत येथे विविध लाभार्थ्यांना दाखल्यांचे वाटप करण्यात येईल तसेच या कार्यक्रमात मतदारसंघातील विविध विकासकामांचे भूमिपूजनदेखील होईल.
एम.एम.महाविद्यालयाच्या मैदानावर कार्यक्रमाची शक्यता
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच मंत्री मंडळातील ज्येष्ठ सदस्यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती देखील किशोरआप्पा पाटील यांनी दिली. हा कार्यक्रम नेमका कुठे होईल हे अद्याप निश्चीत झाले नसले तरी साधारणपणे एम.एम. महाविद्यालयाच्या मैदानावर याचे आयोजन करण्यात येणार असल्याची शक्यता असल्याचेदेखील आमदार पाटील म्हणाले.

यांची पत्रकार परीषदेला उपस्थिती
या पत्रकार परीषदेला शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, तालुकाध्यक्ष सुनील पाटील, बाजार समिती सभापती गणेश पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, प्रांताधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार प्रवीण चव्हाणके आणि मुख्याधिकारी शोभा बाविस्कर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या सभेच्या नियोजनासाठी पाचोरा आणि भडगाव या दोन्ही तालुक्यातील अधिकार्यांची बैठकदेखील याप्रसंगी घेण्यात आली. या तयारीचा आढावा आमदार किशोरआप्पा पाटील यांनी घेतला.
दरम्यान, 26 ऑगस्ट रोजी होणार्या कार्यक्रमानिमित्ताने येथे प्रशासनातर्फे आतापासून जोरदार तयारी सुरू झाली आहे. या कार्यक्रमात पाचोरा येथे मंजूर करण्यात आलेली एमआयडीसी, 50 खाटांचे शासकीय रुग्णालय, काकणबर्डी येथील मंजूर करण्यात आलेला विकास आराखडा आदींचा शुभारंभदेखील या कार्यक्रमात होईल.
