भुसावळातील दोन सहाय्यक निरीक्षकांची रावेरला बदली
शहरात तिघे नव्याने दाखल : पोलीस अधीक्षकांनी फिरवली भाकरी
Transfer of two Assistant Inspectors from Bhusawal to Raver भुसावळ : जळगाव जिल्हा पोलीस दलातील 15 सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह 15 पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी सोमवार, 21 ऑगस्ट रोजी रात्री उशीरा केल्या आहेत. बदली झालेल्या अधिकार्यांना नवीन पदाचा पदभार तात्काळ घेण्याचे निर्देश देखील पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. दरम्यान, भुसावळ शहरातील दोन सहाय्यक निरीक्षकांची रावेरात बदली करण्यात आली असून एकाला विनंतीवरून मुदतवाढ देण्यात आली तर एका सहाय्यक निरीक्षकांसह दोन उपनिरीक्षक शहरात नव्याने बदलून आले आहेत.
30 पोलीस अधिकार्यांच्या बदल्या
गेल्या काही महिन्यांपासून जळगाव जिल्हा पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश प्रलंबित होते. महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार सक्षम प्रधिकारी म्हणून जिल्हास्तरावरील पोलीस अस्थापना मंडळ यांना प्रदान असलेल्या अधिकाराचा वापर करून पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी आदेश काढले आहे. यात विनंती बदली, नव्याने हजर झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकांच्या नवीन नेमणूका, प्रशासकीय बदली बाबत सर्व बाबींचा विचार करून पोलीस प्रशासनाकडून सोमवार, 21 ऑगस्ट रोजी रात्री उशीरापर्यंत आदेश काढण्यात आले. यात जळगाव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याचे 15 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 15 पोलीस उपनिरीक्षक अशा 30 पोलीस अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांनी काढले.






भुसावळातील दोन अधिकार्यांच्या बदल्या : तिघांची नियुक्ती
भुसावळ बाजारपेठचे सहाय्यक निरीक्षक मंगेश गोंटला व हरीष भोये यांची रावेर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी कुणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही तर भुसावळ तालुक्याचे अमोल पवार यांना एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे तर नियंत्रण कक्षाचे अनिल छबूराव मोरे यांची भुसावळ शहर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली. फैजपूरचे पोलीस उपनिरीक्षक मसलोद्दीन जैनोद्दीन शेख व जळगाव नियंत्रण कक्षाचे भगवान काशीनाथ शिरसाठ यांची बाजारपेठ पोलीस ठाण्यात उपनिरीक्षकपदी बदली करण्यात आली.


