नाशिकमधील तरुणाच्या हत्येचे ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर
‘This’ is the shocking reason behind the murder of a young man in Nashik नाशिक : शहरात गेल्या काही दिवसांपासून खुनांचे सत्र कायम आहे. विश्वनाथ उर्फ बबलू भीमराव सोनवणे (27,रा.रामेश्वर कॉलनी) या तरुणाचा गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत खून झाल्यानंतर त्याच्या मित्राने अपघात झाल्याचा बनाव केला मात्र पोलिसांनी खुनाचा उलगडा केला आहे. दारूची पार्टी करण्यासाठी एकत्र आलेल्या मित्रांमध्ये शाब्दीक वाद होऊन आपआपसांत हाणामारी झाली. यावेळी एकाने त्याच्याजवळ असलेले धारधार शस्त्र काढून सोबत असलेल्या मित्राच्या पोटात भोसकल्यानंतर बबलूचा शनिवारी मृत्यू झाल्याचे उघड झाले.
मद्यप्राशन करताना झालेला वाद बेतला जीवावर
गंगापुर पोलिस ठाणे हद्दीत शिवाजीनगर भागात शनिवारी रात्री संशयित आरोपी समेशर रफिक शेख (40,रा.कार्बननाका), दीपक अशोक सोनवणे (रा.श्रमिकनगर) हे दोघे व बबलू सोनवणे हादेखील त्यांच्यासोबत मद्यप्राशनासाठी एकत्र आले व तिघेही जुने मित्र आहेत. यावेळी शेख व बबलू यांच्यात किरकोळ कारणावरून बाचाबाची झाल्याने दीपक यानेही बबलूला मारहाण करण्यास सुरूवात केली. दोघांनी सुरूवातीला हाताने त्याला मारहाण केली. याचवेळी शेख याने त्याच्याजवळ असलेल्या धारधार शस्त्राने त्याच्यावर वार केले. वर्मी घाव लागल्याने बबलू रक्ताच्या थारोळ्यात कोसळून मृत्युमुखी झाला.

आधी केला अपघाताचा बनाव
संशयितांनी दुचाकीवरून एका खासगी रूग्णालयात बबलू यास नेले. तेथे त्याच्या जखमेवर काहीतरी पट्टी लावून रूग्णालयाच्या रुग्णवाहिकेतून जिल्हा रूग्णालयात रात्री दोघांनी उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकिय अधिकार्यांनी तपासून बबलू यास मयत घोषित केले. सुरूवातीला संशयितानी अपघाताचा बनाव केला मात्र पोलिसांनी हा बनाव हाणून पाडला. संशयितांविरूद्ध बबलू याचा भाऊ ज्ञानेश्वर भीमराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगापुर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
