भुसावळात पाठलाग करताना अवैध गौण खनिजाची वाहतूक करणारा डंपर उलटला : त्रिकूटाविरोधात गुन्हा


भुसावळ : अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक करणार्‍या डंपरला महसूल पथकाने अडवल्यानंतर डंपर चालकाने सुसाट वेगाने वाहन चालवल्याने डंपर उलटल्याची घटना काहूरखेडा शिवारात 1 रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने खळबळ उडाली असून डंपर चालक, मालकासह चौघांविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पथकाला पाहताच डंपर चालक सुसाट
प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार निता लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध गौण खनिज रोखण्यासाठी तलाठी मंगेश वासुदेव पारीसे (भिरूड कॉलनी, भुसावळ), वराडसीम तलाठी नितीन केले, साकेगाव कोतवाल जितेश चौधरी हे साकेगाव महामार्गावर गस्तीवर असताना शुक्रवार, 1 रोजी पहाटे 1.45 वाजता डंपर (एम.एच.19 झेड.5668) हा सुसाट वेगाने अवैध वाळूची वाहतूक करताना आढळल्याने पथकाने त्यास थांबवण्याचा इशारा केला मात्र चालक सुसाट वेगाने वाहन पळवू लागल्याने पथकाने पाठलाग सुरू केला मात्र बोहर्डी-हतनूर रस्त्याकडे डंपर वळवल्याने पथक पुन्हा पाठलाग करीत असताना चालकाने काहूरखेडा शिवारातील मानपूर शिवरस्त्यालगत वीज कंपनीच्या सबस्टेशनजवळ डंपर उलटे केल्यानंतर चालक पसार झाला तर त्यातील दोन मजुरांनी जीव वाचवत पळ काढला.







पथकाने शुक्रवारी सकाळी डंपर सरळ करून तहसील कार्यालयात जप्त केले तर याप्रकरणी तलाठी तलाठी मंगेश वासुदेव पारीसे (भिरूड कॉलनी, भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून डंपर मालक दीपक भालचंद्र बोंडे (खर्ची, नशिराबाद), अनोळखी चालक व त्यातील दोन अनोळखी मजुराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. चार लाख 25 हजार रुपये किंमतीचे डंपर व नऊ हजार रुपये किंमतीची रेती जप्त करण्यात आली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !