राष्ट्रवादीचे तीन आर युवा वर्गाला पक्षासोबत जोडतील : आमदार एकनाथराव खडसे
NCP’s three R’s will connect the youth with the party : MLA Eknathrao Khadse मुक्ताईनगर : आपल्या वाढदिवसानिमित्त नेत्र रोग तपासणी शिबिर आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. एखाद्या व्यक्तीला दृष्टी प्राप्त होईल याहून मोठा आनंद नाही. कुर्हा ग्रामपंचायतीत नवीन सरपंच सदस्य निवडून आल्यापासून अनेक विकास कामे व नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. कुर्हा गावाच्या विकासासाठी आतापर्यंत कोट्यवधींचा निधी दिला, भविष्यात सुद्धा निधीची कमतरता भासू देणार नाही. रोहिणी यांची महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने त्या नक्कीच पक्षवाढीसाठी चमकदार कामगिरी करतील. येता काळ हा युवा वर्गाचा असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीन आर अर्थात रोहित पवार, रोहिणी खडसे व रोहित पाटील हे युवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जोमाने कार्य करून युवा वर्गाला पक्षा सोबत जोडतील, असा विश्वास आमदार एकनाथराव खडसे यांनी येथे व्यक्त केला. वाढदिवसानिमित्त तसेच अॅड.रोहिणी खडसे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन
माजी महसूल मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त कुर्हा ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच डॉ.बी.सी.महाजन आणि कुर्हा ग्रामपंचायतीचे सदस्य यांच्यातर्फे मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर तसेच रोहिणी खडसे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुर्हातर्फे रोहिणी खडसे यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिबिरात 275 रुग्णांची नेत्र रोग तपासणी करण्यात आली. शिबिरात नेत्ररोग शल्य चिकित्सक डॉ प्रविण पाटील, नेत्ररोग अधिकारी युवराज ठोमरे, तुषार जोशी यांनी रुग्णांना सेवा दिली. शिबिरात मोफत मोतीबिंदू तपासणी व मोफत टाके विरहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसे यांची नियुक्ती झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कुर्हा, ग्रामपंचायत कुर्हा, विविध कार्यकारी सोसायटी कुर्हा यांच्यातर्फे नागरी सत्कार करण्यात आला.

पक्षाचे विचार पोहोचवणार
रोहिणी खडसे म्हणाल्या की, पक्ष नेतृत्वाने दिलेल्या जबाबदारीला पूर्ण क्षमतेने पार पाडून पक्षाचे विचार सर्व सामान्यांपर्यंत पोहचवून पक्ष संघटन वाढवून जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण सर्व पदाधिकार्यांनी साथ द्यावी, असे उपस्थित पदाधिकार्यांना त्यांना आवाहन केले. यावेळी कुर्हा परीसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
