राष्ट्रवादी सुप्रीमो शरद पवारांची उद्या जळगावात सभा
मराठा आरक्षणावर धडाडणार तोफ : आमदार एकनाथराव खडसेंनी केले नियोजन
Nationalist supremo Sharad Pawar’s meeting in Jalgaon tomorrow जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांची मंगळवार, 5 रोजी जळगावच्या सागर पार्कवर दुपारी दिड वाजता सभा होत आहे. खासदार शरद पवार या सभेत नेमके काय बोलणार? याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याने राज्यात वातावरण तापले असतानाच शरद पवार या सभेत राज्य सरकारवर टिकेचे बाण चालवतील? असा अंदाज आहे.
जिल्ह्यात पहिलीच सभा
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर खासदार शरद पवार यांची जळगाव जिल्ह्यात पहिलीच सभा होत आहे. या सभेकडे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पाहिले जात आहे त्यामुळे जिल्हा राष्ट्रवादीकडून राज्यातील आतापर्यंतच्या सर्व सभांपेक्षा जळगावची सभा सर्वात मोठी ठरावी यासाठी नियोजन केले जात आहे. सागर पार्कवर भव्य मंडप उभारण्यात आला असून 30 हजार जण उपस्थित राहतील असा दावा केला जात आहे. सोमवारी आमदार एकनाथराव खडसे, अॅड.रोहिणी खडसे यांच्यासह पदाधिकार्यांनी सभा स्थळाची पाहणी केली.

महापौरांच्या निवास्थस्थानी देणार भेट
खासदार पवार मुंबईहून सकाळी 9.50 वाजता जळगाव विमानतळावर येतील व 10 वाजता जळगाव शहरात येण्यासाठी निघतील. 10.15 ते 10.30 दरम्यान मेहरूण येथे महापौर जयश्री महाजन यांच्या निवासस्थानी भेट देतील. त्यापुढील वेळ हा जैन हिल्स या ठिकाणी राखीव ठेवण्यात आला आहे.
राष्ट्रवादीकडून वातावरण निर्मिती
दुपारी दीड ते साडेचार वाजेपर्यंत खासदार पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सागर पार्कवर सभा होईल. सभा संपल्यानंतर पाच वाजता ते जळगाव विमानतळावरून मुंबईसाठी रवाना होतील. सभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार दोन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात असून, विविध भागात दौरे, जनतेशी संवाद आणि सभा घेत आहेत. वातावरण निर्मितीसाठी पक्षाकडून पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत.
